बालपणापासून आजी-आजोबांचे बोट धरून मंदिरात जाण्याची आपल्याला सवय लागली. तेव्हापासून सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्तगुरुंचा, शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीरायाचा हे समीकरण मनात पक्के झाले. रविवार सूर्यदेवाचा, परंतु त्याचे मंदिर नाही, म्हणून रविवारी सुटी. या सवयीमुळे कोणत्या देवाला काय आवडते, हेही आपल्याला माहित झाले. मात्र, ते का आवडते, याचा शोध घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? देवदेवतांना आवडणाीऱ्या गोष्टींमागे अनेकदा सूचक विधान असते, तसेच काही पौराणिक कथांचा संबंधही असतो.
आता आपले बजरंगबलीच बघा ना, त्यांना उडीद, तेल, शेंदुर, रुईच्या पान-फुलांचा हार आवडतो. या सर्व गोष्टी आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. बलवर्धक, शक्तीवर्धक आहेत. बजरंगबलींनी व्यायाम करून शरीर कमावले. त्या शरीराला पोषक घटक वरील गोष्टींतून मिळतात, म्हणून आजही त्यांच्या दर्शनाला जाताना आपण घरातून काळे उडीद घातलेले तीळाचे तेल घेऊन जातो व मंदिरातून रुईच्या पानाफुलांचा हार विकत घेऊन देवाला वाहतो.
तरीदेखील एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे हनुमंताला शेंदूर का वाहिला जातो? तोही केवळ गंधापुरता नाही, तर सर्वांगाला का? यामागे एक पौराणिक कथा आहे.
एकदा सीता माई साजश्रुंगार करत होती. त्याचवेळेस हनुमंत तिथे पोहोचले. मातेला नमस्कार केला आणि तिचे सात्विक रूप निहाळत होते. सगळा श्रुंगार झाल्यावर सीता माईने आपल्या भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ती पाहता, हनुमंताने कुतुहलाने विचारले, `माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?' त्यावर हसून सीता माई म्हणाली, `हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्य अलंकार आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात.'
यावर हनुमंत म्हणाले, `पतीला दीर्घायुष्य, म्हणजे प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य! पती म्हणजे पालन करणारा. याअर्थी ते माझेही, नव्हे तर या साऱ्या विश्वाचे पती आहेत. मग तुमच्यासारखेच प्रत्येकाने भांगात शेंदूर लावले पाहिजे आणि लावायचेच आहे, तर केवळ एक रेघ का? माझ्या रामरायाचे नाव अजरामर व्हावे, त्याचे अस्तित्त्व कायम राहावे, म्हणून मी शेंदूराची पूर्ण वाटीच अंगाला चोपडून घेतो.'
हनुमंतांनी नुसते म्हटले नाही, तर क्षणार्धात सर्वांगाल सिंदुरलेपन करून घेतले. त्याची ती वेडी रामभक्ती आणि अलोट रामप्रेम पाहून सीता माईला आणि रामरायाला भरून आले. तेव्हापासून हनुमंताला शेंदूर अर्पण करायची प्रथाच सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे.
सीयावररामचंद्रकी जय! पवनसुत हनुमान की जय!