श्रावण महिना आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या दिवशी पूजेसाठी अनेक वनस्पती वापरल्या जातात. विशेषतः गौरी गणपतीला आणि त्याआधी हरतालिकेच्या पूजेला पत्री वापरली जाते. सध्या बाजारात पैसे दिले की पत्री आयती विकत मिळते. पूर्वी रानात जाऊन पूजेसाठी लागणारी पत्री गोळा केली जाई. त्यामुळे आपसूकच सगळ्या झाडांशी परिचय होत असे. कोणती वनौषधी कुठे वापरली जाते, याची माहिती मिळे. आता ही माहिती फक्त गुगलवर वाचायला मिळते. म्हणून हरितालिकेला वाहिली जाणारी पत्री आधी नीट बघून घ्या, जाणून घ्या, तिचा वापर कसा आणि कुठे केला जातो ते पहा आणि मग वाहा!
पत्री म्हणून गोळा केलेल्या वनस्पती आता दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. मुंबईच्या बाजारात या वनस्पती विक्रीसाठी येतात मात्र तुलनेने हे प्रमाण कमी आहे. शिवाय त्यासाठी पैसे मोजावे लागतात ते वेगळे. पैसे मोजूनही त्या वनस्पती मिळतील की नाही? याचीही शाश्वती नसते. कारण अशा वनस्पती ओरबडल्याने त्या औषधालाही राहतील की नाही? याची शंका वनस्पती तज्ज्ञ मांडतात. त्यामुळे जैवविविधता आपणच टिकवली आणि वाढवली पाहिजे हा संदेश त्यातून लक्षात घेतला पाहिजे.
चला जाणून घेऊया पत्री आणि तिचा वापर :
- तुळस - तुळशीमध्ये दाहक विरोधी आणि कफ पाडणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते.
- धोत्रा - कानाचे दुखणे, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
- आघाडा - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
- डोरली - दाढ किडल्यास, ज्वरावर, मुत्राघातावर, खोकल्यावर, दम्यामध्ये, श्वासनलिकेची सूज, फुप्फुसाची सूज, श्वसनाचे विकार सर्दी, पडसे, खोकला, दमा, स्वरभंग, जीर्णज्वर अशा विकारांवर काटे रिंगणी फार उपयोगी ठरते.
- शमी - औषधी म्हणून दमा, कोड व मनोविकारामध्ये सालीची पूड, काढा गुणकारी असल्याचे ऐकण्यात आहे.
- माका - माका मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते.
- गोकर्णी - वनस्पती शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते.
औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवा आहेत. त्या अतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होऊन जातील आणि आपलेच नुकसान होईल. वनस्पती स्थानिक जैव साखळीचा महत्त्वाचा दुवा आहेत. अनेक प्रकारचे मातीमध्ये असलेले सूक्ष्म जंतू, वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक, धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र किटक, फुलपाखरे, पक्षी यांनी मिळून अन्न साखळी व जैव साखळी यांचा समतोल निसर्ग साधतो. त्यामुळे या वनस्पती जपल्या पाहिजेत. संवर्धन केले पाहिजे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका