>> रवींद्र वासुदेव गाडगीळ
यंदा ६ सप्टेंबर रोजी हरतालिका (Hartalika Teej 2024) आहे. कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मोजन्मी मनासारखा पती (जोडीदार) मिळावा किंवा मिळालेला पती (हूकूमशहा नव्हे,सहकारी,तीची व कुटुंबाची काळजी घेणारा) मनासारखा वागावा, हीच मनीषा धरून कडक, उपवास करून हरतालिका व तिच्या सखीची पूजा करण्याचा दिवस. या पूजेतून विवाहेच्छुकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे, कसे ते पहा!
हिमालय राजाची ही कन्या म्हणजे हरतालिका. वडिलांनी विवाहाच्या बाबतीत मुलीचा विचार न घेता जोडीदार निवडण्याचा तो काळ. आता या कलियुगात तोच विचार उलटा झाला. मुला-मुलींनी विवाहाच्या बाबतीत वडिलांचा विचार न घेता जोडीदार निवडण्याचा. आधी लव्ह मग मॅरेज. पूर्वी आधी मॅरेज, मग लव्ह असा पायंडा होता. पालकच आपल्या मुलामुलींचे हित कशात आहे, ते जाणत व विचारपूर्वक निर्णय घेत. त्यामुळे संसार सुखाचे-समृद्धीचे-समाधानाचे होते. त्यामुळे मुलगी किंवा मुलगा जोडीदाराच्या गळ्यात निमूटपणे हार टाकून मोकळे होई.
परंतु याच परंपरेला छेद दिला या हिमकन्या पार्वतीने. तिचे लग्न ठरले होते, श्रीविष्णूंशी. पृथ्वीचा पालनकर्ता, त्रैलोक्याचा राजा, सुंदर, लोकप्रिय, भक्तप्रिय, सर्वांच्या सहाय्याला कायम धावून जाणारा, सुखवस्तू असे श्रीमंत बहुगुणी स्थळ चालून आल्यावर कोणता बाप आपली मुलगी देणार नाही बरे? परंतु, तसे व्हायचे नव्हते. पार्वतीच्या मनात काही वेगळेच होते. "पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना" तिने वैराग्य, विरक्तीने भारलेला, गरीब, बेघर, स्मशानात राहणारा, सदा ध्यानस्थ, मागेल त्याला काहीही देणारा, प्राणी-पशू-पक्ष्यांच्या सान्निध्यात राहणारा, आगापिछा नसणारा, भोळा शंकर, केवळ त्याच्या या सद्गुणावर व मदनासारख्या रूपावर ती भाळली. तिने बंडखोरी केली. चक्क पळून गेली. अरण्यात राहून, कंदमुळे , पाने खाऊन अतिशय उग्र तपस्या केली. झाले. भोळे सांब प्रसन्न झाले व त्यांनी तेथल्या तेथे `गांधर्व' विवाह केला.जगातील नव्हे, त्रैलोक्यातील हा खरा पहिला प्रेमविवाह..
आवडीचा वर पसंत करून त्याच्याशी विवाह केला. त्याही काळी मुलीचे मत विवाहाच्या वेळी विचारात घेतले जाई, परतु तो तिला व घराण्याला, समाजाला साजेसा म्हणजे रंगरुपाने नव्हे, तो मुद्दा गौण आहे. परंतु तिला पोशील असा हवा, असा विचार वडिलधाऱ्या मंडळीत असे. आता बहुतांशी तो विचार केला जात नाही. प्रेमात पडतात. परंतु पडल्यावर आपल्या पायावर पुन्हा उभे राहण्याचे सर्वांनाच जमते. असे नाही. १० ते २० टक्के विवाह होतात अन् त्यातले १० ते २० टक्केच यशस्वी होतात. प्रेमाचा रंग उडाला की केवळ विवाह राहतो. मग ती तडजोड राहते. आजही विवाहाच्या बाबतीत कोणतेच भेद पाळले जात नाहीत हे खरे आहे व चांगलेही. परंतु, वितुष्ट निर्माण झाले, की एकमेकांचे नको ते "भेद" काढले जातात. त्याला मर्यादा नसते. मग वैफल्य येते, घटस्फोट होतात, प्रेमभंग होतात, प्रसंगी घात-अपघात आणि हत्याही. अगदी वैयक्तिक, सामुहिक, गाव, समाज पातळीपर्यत.
आजच्या या व्रतातून आपल्याला नेमके हेच घ्यायचे आहे, की पार्वतीने कोणताही भेद न पाळता प्रसंगी आपल्या माणसांना दूर करून केवळ गुण बघून तावून सुलाखून मग जोडीदार निवडला. त्यासाठी उग्र तप केले. निष्ठा ठेवून त्याच्याशीच संसार केला. तेव्हाच तिला महापराक्रमी, लोकप्रिय, बुद्धिवंत असे कार्तिकेय व श्रीगणेश पूत्र प्राप्त झाले. पतीचा व सासरचा अपमान, तो आपला मानून प्रिय अशा माहेरशी संबंध तोडले, ही एकनिष्ठा. प्रेम करताना गुण-दोषासकट ती व्यक्ती केवळ आपली म्हणून स्वीकारायची असते. सुख-दु:खात सहभागी व्हायचे असते. त्याला अर्धांग असे म्हणतात. एकमेकांच्या विचारविनिमयातून संसाराचे जाळे घट्ट विणायचे असते. मग ते मोजून सात जन्मासाठीच का? कायमचेच! `का भुललासी वरलीया रंगा' कींवा `चेहेरोने लाखों को लुटा' असे प्रेम नको ते बेगडी असते. कापराप्रमाणे उडून जाते. प्रेम हे वासनारहित असावे. दृढ व निखळ असावे. लिव्ह ईन रिलेशनशीप मुळीच नको. क्षुल्लक कारणावरून रिलेशन बिघडले की आपले ship भरकटते अन् मग दुःखाच्या खडकावर जाऊन आपटते
एकाला काटा टोचला, तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे, याला प्रेम म्हणतात. मग ते कोणाचेही असो,कोणामध्येही असो,कोणतेही असो, ते सर्वथा सारखेच असते. इथे तर साक्षात त्रिभुवन रूप सुंदरी परंतु गुणग्राहक. गुणांची पूजा करणारी. माणसाने रूपाचे कींवा बाह्यांगाचे, डामडौलाचे, श्रीमंतीचे वा पदव्यांचे, पदांचे पूजन न करता गुणांची कदर करावी मग तो मानव ही देव बनून पूजनीय होतो. हीच या व्रताची सांगता.