- सुजाता पाटीलरावणाने सीतेला पळवून नेलं तेव्हा श्रीरामांसमोर युद्धाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी श्रीलंकेत युद्ध केले व जिंकलेही. परत येताना ते लक्ष्मणाला म्हणाले मी राज्यात जाऊ इच्छित नाही. हिमालयात अगस्त्य ऋषींच्या गुंफेत मला काही दिवस व्यतीत करायचे आहेत. आश्चर्यचकित लक्ष्मण म्हणाले, का? श्रीराम उत्तरले, मला दहावेळा रावणाचा वध करावा लागला. लक्ष्मण रागाने म्हणाले, ‘त्याने तुमची पत्नी पळवून नेली होती.’ शांतपणे श्रीराम म्हणाले, ‘ते वाईट काम त्याच्या त्या नऊ डोक्यांचं होतं; पण एक डोकं सुंदर होतं, ज्यात ज्ञान, धार्मिकता आणि भक्ती अपार होती. त्या डोक्याचा वध करण्याचा मला कोणताही अधिकार नाही. रागाच्या भरात केलेल्या या कृत्याने मीही पापीच ठरलो.’ श्रीराम आपल्याला हेच सांगतात की, व्यक्तींमध्ये असंख्य दोष असतात. त्या दोषांचा द्वेष करा, व्यक्तीचा नको. रावणाप्रमाणे प्रत्येकाला अशी दहा डोकी असतात. ज्यात मद, मत्सर, अहंकार, गर्व, घंमेड. गर्व असतो. जो प्रथम आपल्याला ज्या रूपात बघेल तसं आपल्या विषयीचं मत ठरवतो. म्हणजे कुणी भांडण करताना पाहिलं की भांडखोर असा शिक्का मनात कायमचा बसतो. कुणी अभ्यासू, कुणी स्वार्थी, कुणी वासनिक इ. म्हणजे ज्या रूपात आपल्याला पाहाणार, आपल्याबद्दलची तीच धारणा तो धरून बसणार. म्हणजे माणसांची दहा डोकी दहा ठिकाणी वेगवेगळी कामं करतं असतात. खूप दिवसांनी जुना मित्र आपल्याला वाईट दिसू लागतो तर एखाद्यी अपरिचित व्यक्ती लगेच चांगली वाटते. एखाद्या व्यक्तीशी मैत्री केल्याने तुम्हाला त्याचे गुण अवगुण, कमतरता हे सगळं चांगल्या तºहेने माहीत असते. त्याला उगाच भावनिक तिढ्यात अडकवून अबोल्याचं शस्त्र वापरणं चूक आहे. म्हणून त्याच्यातील एकतरी चांगला गुण जरूर ओळखा आणि मैत्रीचा हात एकवार स्वत:हून पुढे करा. श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?
द्वेष केवळ दोषांचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:24 AM