मी म्हणेन ती पूर्व, हा आपला स्वभाव असतो. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला योग्यच वाटत असते. परंतु, अचानक असे काही घडते की आपली चूक नसतानाही आपल्याला शिक्षा भोगावी लागते. असे का घडले, याचा विचार स्वतःच्या नाही, तर समोरच्याच्या दृष्टिकोनातून केला तर आपल्या चुकांचा उलगडा आपल्याला नक्कीच होऊ शकतो; सांगत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!
ते म्हणतात दृष्टिकोन बदला, जग बदलेल. पण आपण नेमके उलट करण्याचा हट्ट धरतो. जग बदलू पाहतो आणि जगाला आपला दृष्टिकोन देऊ पाहतो. तसे घडतेही, परंतु आपले प्रयत्न योग्य दिशेने असले तरच! यासाठी समोरच्याचे विचार समजून घेण्याचीही सवय असावी लागते. जे आपल्याला योग्य वाटते, ते समोरच्याला योग्य वाटेलच असे नाही. त्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहिले, तर कदाचित नाण्याची दुसरी बाजू जाणून घेता येईल.
एक मुलगा खेळत खेळत आपल्या आई जवळ येतो. आईला म्हणतो, 'तू काय करतेयस?' आई सांगते, 'मी भरतकाम करून तुझ्या शर्टावर छान नक्षीकाम करतेय.'
धाग्या दोऱ्यांची गुंतागुंत पाहून मुलगा म्हणतो, 'शी, ही कुठली नक्षी, हा तर नुसता दोऱ्यांचा गुंता आहे.'आई हसून मुलाला मांडीवर घेते आणि शर्टाची वरची बाजू दाखवत म्हणते, 'बाळा, तू चुकीची बाजू बघत होतास. आता वरून बघितल्यावर दिसली की नाही नक्षी?'ते पाहून मुलगा आनंदून गेला. त्याने पाहिलेली बाजू त्याला योग्य वाटत होती, पण गुंतागुंतीची दिसत होती. आईने दुसरी बाजू दाखवल्यावर त्याला दोऱ्यांनी गुंफलेली सुंदर नक्षी दिसली. परंतु मुलाने आपलेच म्हणणे रेटून धरले असते, तर त्याला त्याचेच म्हणणे योग्य वाटले असते आणि चांगली कलाकृती पाहण्यापासून तो मुकला असता. यासाठी नाण्याची दुसरी बाजू दाखवणारी आणि ती पाहायची तयारी असलेली व्यक्ती हवी. क्षणार्धात दृष्टिकोन बदलतो आणि संपूर्ण जगच सुंदर दिसू लागते.
त्याचप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले भोग संपवताना त्रास होत असला, तरी देवाने भविष्यात नक्कीच काहीतरी चांगले वाढून ठेवले असेल हा विचार नक्की करा. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेतूनही बघायला शिका. दुसऱ्यांचे म्हणणे समजून घ्या. गैरसमजांची भिंत दूर होईल आणि आयुष्य नक्षीदार होईल.