बालपणी जेवणाआधी, जेवताना, जेवणानंर आईच्या सूचना सुरूच असत. त्यावेळी जाचक वाटणाीऱ्या गोष्टी आयुष्यभरासाठी सुदृढ आरोग्याचा कानमंत्र होता, हे मोठेपणी लक्षात येते. बालपणीच चांगल्या सवयी अंगवळणी पडल्या, की आयुष्यभर आरोग्याची हेळसांड होत नाही. त्या सवयीतला मुख्य भाग जेवणाचा. जेवायच्या आधी हात धुवून ये, एक घास बत्तीस वेळा चावून खा, श्लोक म्हण, जेवताना बोलू नको, जेवताना पाणी पिऊ नको, जेवणाच्या ताटात अन्न टाकू नको, ताटाभोवतीची शिते जमीनिवर ठेवू नको, जेवणानंतर स्वच्छ चूळ भर, शतपावली कर, थोडी विश्रांती घे आणि मग पुढच्या कामाला लाग, या सूचनांचे आजही आपण शक्य तसे पालन करतो. वरील सूचनेतील प्रत्येक वाक्य, हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तुर्तास आपण शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व समजून घेऊ.
आपण आपल्या आजोबांना जेवणानंतर शतपावली मारताना पाहिले असेल. आजच्या काळात आपण त्याला नाईट वॉक म्हणतो, एवढाच काय तो फरक. परंतु, जेवणानंतर सावकाश पावले टाकत अन्न जिरवण्यासाठी चालण्याची क्रिया गरजेची आहे. म्हणून पूर्वीचे लोक त्याला रामरक्षेची, अथर्वशीर्षाची किंवा नातवंडांकडून परवचा म्हणवून घेण्याची जोड लावत. आता ती जागा मोबाईलवरील संवाद किंवा गाण्यांनी घेतली आहे. एका श्लोकात म्हटले आहे,
भुक्तावोपविशत: स्थल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्युर्धावति धावत:
भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करणे, हाच एकमेव उपाय आहे.
शतपावलीमुळे पोटातील अन्न पचनशील होण्यास मदत होते. अन्नाचे नीट पचन झाले, तर नानाविध व्याधी जन्माला येण्याआधीच समूळ नष्ट होते. जेवून झाल्यावर एका जागी बसणे, लगेच झोपणे किंवा वेगाने काम करणे अपेक्षित नाही. तर शरीराची हालचाल होणे, महत्त्वाचे असते. चालणे, हा सर्वांगुसंदर व्यायाम मानला जाता़े मात्र, जेवणानंतर प्रभातफेरीसारखी फेरी मारणे उपयोगाचे नाही. तिथे उपयोग फक्त शतपावलीचा. शतपावली म्हणजे काय, तर मोजून शंभरएक पावले चालणे.
आजकाल दिवसभरात आपण किती चाललो, हे मोजणारे अॅप, घडयाळ आहेत. दिवसभराचा तोंडी हिशोब ठेवणे शक्य नसले, तरी जेवणानंतरची शतपावली करणे सहज शक्य असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात करणे अपेक्षित असते.
वामकुक्षीचे महत्त्व काय?जेवणानंतर आबाल-वृद्धांना आळस येतो. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा उद्योग यातले कोणीही त्यात अपवाद नाहीत. म्हणून शास्त्राने वामकुक्षीचा पर्याय सुचवला आहे. परंतु, हा पर्याय घरी अनुसरता येतो. बाहेर असताना वामकुक्षी घेतली, तर हातात नारळ मिळायची शक्यता अधिक, अशा वेळी भोजन कमी घेणे ईष्ट!
परंतु, वामकुक्षीच का? वाम म्हणून शरीराची डावी बाजू. डावीच बाजू का? कारण जेवणानंतर, शतपावली झाल्यावर, वामकुक्षी घेतल्याने म्हणजे, डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. दुसरे कारण म्हणजे, आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीची क्रिया व्यवस्थित असावी लागते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी मोकळी राहते आणि व्यवस्थित काम करते. म्हणून जेवण झाल्यावर वीस ते पंचवीस मीनिटे वामकुक्षी घेणे, महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते.