पुण्य मिळवून काय स्वर्गात जाणार आहे का? पाप करून नरकात जायचे आहे का? देहातून आत सुटका व्हावी आणि आत्म्याला मोक्ष मिळावा...जन्म-मृत्यूशी निगडित अशा कितीतरी गोष्टी आपल्या बोलण्यात येतात. स्वर्ग-नरक-मोक्ष या कल्पनेने मनुष्य पापभिरु होतो आणि वाईट कर्म करण्यापासून स्वत:ला परावृत्त ठेवतो.
या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.
ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अस्तित्त्वातच नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिसत नाहीत पण त्यांचे अस्तित्त्व आपण मान्य करतो. आणखी एक उदाहरण कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु गेले दीड वर्ष ज्या कोरोनाने जगभर थैमान घातले, तो शास्त्रज्ञांनाही दिसला नाही, पण त्याच्या अस्तित्त्वाचे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचेही अस्तित्त्व मान्य करावे लागलेच.
या विश्वात न दिसणारे असे कितीतरी सत्य भरलेले आहे. ते दिसणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक सत्य आहे. त्या अदृश्यावरच हे सर्व विश्व आधारित आहे. म्हणून तर शास्त्रज्ञ अवकाशाच्या संशोधनात मग्न आहेत.
आपल्या ऋषिमुनींनी योग मार्गाने हे सर्व पूर्वी जाणले आहे. नरक, स्वर्ग, मोक्ष यातील काहीच नाही असे गृहित धरले तर धर्माचरण करणे सगळेच सोडून देतील. लोक कशालाच, कोणालाच घाबरणार नाहीत, बेबंधपणे वागतील. धर्माचरणामुळे समाजाला एक शिस्त लावलेली आहे. स्वर्ग, नरक या संकल्पनांमुळे मनुष्याला धर्माचरणासाठी प्रवृत्त केले जाते.
कलियुगात पुण्यकर्मे लवकर फलदायी ठरतील असे गरुडपुराणात म्हटले आहे. तर पापकर्मे शीघ्रफलदायी होणार नाहीत. कारण केलेले पाप कालांतराने सिद्ध होते. कलियुगात पुण्य कर्माची सिद्धी केवळ संकल्पाने होते. पण पाप आचाराने सिद्ध होते.
हे सर्व जाणून अल्पकष्टाने महत्फल मिळणाNया या काळात प्रत्येकाने धर्माचरण करून समाजधारणा साधून आपला उद्धार करून घेणे योग्य ठरत़े