बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते, तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी, यासाठी सोपे उपाय करून पहा.
- रोजच्या देवपूजेच शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा. कारण, शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे.
- लक्ष्मीमातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल. म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी. त्यामुळे धन वृद्धी होते.
- लक्ष्मी माता कमळात विराजमान असते. ते तिचे आवडते स्थान आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे, गुलाबी कमळ अर्पण करावे.
- महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे साखर, दही साखर किंवा खडीसाखरदेखील चालू शकेल.
- एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे. श्रीफळ हे समृद्धीचे द्योतक आहे.
- तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम! देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे.
- वैजयंती फुलदेखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते. भक्तीभावाने हे फुल अर्पण केले असता, देवीची कृपादृष्टी लाभते.
- केळ्याची बाग जिथे असते, तिथे आर्थिक चणचण भासत नाही. परंतु, प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते, तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा.
- ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते.
- रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते, म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा. ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते.
- अस्ताव्यस्त, पसरलेले घर आपल्याला आवडत नाही, तर देवीला तरी कसे आवडणार? म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले आणि नीटनेटके असाव़े अशा घरात देवी मुक्तहस्ते आशीर्वाद देते.
- जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते, त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो.