जीवनात यश मिळवण्यासाठी काही गोष्टीचे नियमन अतिशय महत्त्वाचे असते. मोठे यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी आखणीही मोठी लागते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या यश मिळविण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. चाणक्य नीती सांगते की यश मिळवण्यासाठी ४ गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीत कमतरता असल्यास यशापासून वंचित राहाल.
यश मिळवण्यासाठी या ४ गोष्टी आवश्यक आहेत
रणनीती : रणनीती केवळ युद्धात नाही तर यशप्राप्तीसाठी सुद्धा करावी लागते. ती योग्य असेल तर अशक्य वाटणारे ध्येयही गाठता येते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी रणनीती बनवा, त्याप्रमाणे योजना करा आणि मग त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. मात्र आखणी केल्याशिवाय यश मिळणार नाही हे ध्यानात ठेवा.
कठोर परिश्रम: चाणक्य नीती सांगते, आयुष्याचे ध्येय मोठे असले तरी ते साध्य करण्यासाठी छोट्या छोट्या ध्येयांची आखणी करा. जेव्हा तुम्ही छोटे ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवता तेव्हा तुम्ही आपोआपच मोठे ध्येय प्राप्तीसाठी सज्ज होता. यशाचा शॉर्टकट नसतो. तुम्हाला ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाची तयारी ठेवावीच लागते.
वेळेचे व्यवस्थापन : वेळेचा सदुपयोग करणारी व्यक्तीच जीवनात यश मिळवू शकते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा, तसेच तुमच्या ध्येयानुसार कोणत्या कामात किती वेळ द्यायचा हे ठरवा. वेळेचे व्यवस्थापन चांगले असेल तर व्यक्तीला भरपूर यश मिळते. याउलट वेळ वाया घालवणारी व्यक्ती किंवा वेळ न पाळणारी व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
तुमची गुपिते कोणाला सांगू नका: तुम्हाला मोठे यश मिळवायचे असेल तर प्रत्येक बाबतीत गोपनीयता पाळायला शिका, अन्यथा तुमचा द्वेष करणारे लोक त्यात अडथळे आणू शकतात. म्हणून, काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या ध्येयाबद्दल किंवा त्या दिशेने करणाऱ्या प्रवासाबद्दल कोणालाही सांगू नका. कारण रणनीती ही यशाची ब्लू प्रिंट असते. ती कायम गुप्त ठेवा!