ज्योत्स्ना गाडगीळ
एकदा एका मुलाखतीत मुलाखतकाराने उमेदवाराला प्रश्न विचारला, 'तुम्ही कुठे राहता.'
उमेदवाराने उत्तर दिले, 'भ्रमात.'
मुलाखतकार चपापले. त्यांनी उमेदवाराला खुलासा करायला सांगितला, त्यावर उमेदवार म्हणाला, 'महोदय, आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांचे आपल्याभोवती एवढे मोठे वलय असते, की आपण त्याच्यातच वावरत असतो आणि अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो.'
हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!
वरील प्रसंगाचा नीट विचार केला तर लक्षात येईल, खरोखरच, आपण सगळेच जण एका कल्पनेच्या जगात वावरत असतो. त्या कल्पना आत्मोन्नती साधणाऱ्या असतील तर ठीक, मात्र अनेकदा अतिविचाराने काल्पनिक जग नैराश्याने व्यापून जाते. आपण साप साप म्हणत भुई थोपटत बसतो, मात्र वास्तव वेगळेच असते. असाच आपल्या एका शिष्याचा भ्रमाचा भोपळा, त्याच्या गुरुजींनी फोडला आणि त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. त्याचा दृष्टांत-
एक गुरु होते. ते आपल्या आश्रमात राहत होते. एके दिवशी संध्याकाळची प्रार्थना आटोपल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्य शिष्याला बोलावले आणि त्याच्या हातात एक पुस्तक देत म्हणाले, `हे आत ठेवून ये.'
शिष्य पुस्तक घेऊन गेला व उलट्या पावली परत आला. थरथरत म्हणाला, `गुरुदेव, गुरुदेव, आत साप आहे.'
गुरुदेव म्हणाले, `काही हरकत नाही, मी तुला एक मंत्र देतो. तू आत जाऊन मंत्र म्हण. साप निघून जाईल.'
गुरुदेवांनी मंत्र दिला. मंत्र पुटपुटत शिष्य आत गेला. उभ्याने त्याने मंत्र म्हटला, पण साप जिथल्या तिथेच होता.
शिष्य बाहेर आला व म्हणाला, `गुरुदेव, मी पुन्हा पुन्हा मंत्र म्हटला, पण साप गेला नाही.'
'असे म्हणतोस? ठीक आहे. तू आता हा दिवा घेऊन जा. मंत्राने नाही गेला, तरी दिव्याच्या प्रकाशाने तो नक्कीच पसार होईल.'
शिष्य दिवा घेऊन आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला, तेव्हा त्याचे तोंड उतरलेले होते. तो म्हणाला, `गुरुदेव, आत साप नव्हताच मुळी! एक दोरी पडली होती. अंधारात मला वाटले, तो सापच आहे.'
गुरुदेव मोठ्याने हसले व म्हणाले, `बाळा, दिव्याच्या प्रकाशाने तुझा भ्रमाचा भोपळा फुटला. अरे, अवघा संसार असाच भ्रमाच्या जाळ्यात गुरफटलेला आहे. हे आवरण दूर करून सत्यदर्शन हवे असेल, तर त्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. म्हणून ज्ञानाचा दिवा लाव आणि तो तुझ्या अंतरंगात तेवत ठेव.'
गुरुदेव बोलत होते. शिष्य शांतपणे ऐकत होता. पण त्याच्या अंतरंगात ज्ञानज्योत प्रकाशू लागली होती.