होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. या सणाला धूलिवंदन असेही म्हणतात. धूलिवंदन म्हणजे मातीला, पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे. होळीला अग्नी पेटवला जातो, तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापवण्याची प्रथा होती. दुसऱ्या दिवशी पृथ्वीला नमस्कार केला जातो. होळीनंतर बरोबर पंधरा दिवसानंतर नवीन संवत्सराच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याला आकाशाशी नाते जोडणारी उंच गुढी उभारावायाची अशी आपली विचारगर्भ परंपरा आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची सांगड आपल्या सणांमध्ये विचारपूर्वक घातलेली दिसते. मनातील राग होळीच्या दिवशी बोंबा मारून, आरोळ्या ठोकून, एखाद्याच्या नावाने `शिमगा' करण्याची प्रथा देखील या सणात अंतर्भूत केलेली दिसते.
मानसशास्त्रालाही अंतर्मुख करणारी अशी ही व्यवस्था आहे. हल्ली अशा ताणतणावातून मुक्त होण्यासाठी, मग हलके करण्यासाठी जागोजागी हास्यमंडळे काढली गेली आहेत. शेकडो वर्षांपूर्वी वर्षातील निदान एक दिवस तरी अशी तणावमुक्ती मिळावी, मनातील वाईट भावनांचा निचरा व्हावा यासाटी धर्माधिष्ठित प्रथा सुरू करणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या विचारक्षमतेचा आपल्याला अभिमान वाटायला हवा.
मात्र आज बीभत्सतेकडे झुकलेला असे या सणाचे स्वरूप झालेले दिसते. पूर्वी गुलाल उधळून होळी खेळली जायची. आता घातक द्रव्य असलेल्या रंगाने होळी खेळली जाते. शिवाय होळीच्या आधी सातआठ दिवस पाणी भरलेले फुगे लहान मोठा न बघता सर्वांवर उंच इमारतीवरून, गच्चीवरून नेम धरून मारतात. त्याने अनेकांना इजा होतात. अनेकजण गंभीर जखमी होतात. त्यामुळे वडिलधाऱ्यांनी पुढाकार घेऊन तरुणांना, लहान मुलांना या अनिष्ट गोष्टी करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे झाले आहे. उत्सव जरूर करावेत, फक्त त्यात विकृती नको. ज्याची इच्छा असेल तो थोडा गुलाल लावून घेईल. इतरांनी त्याच्यावर सक्ती करू नये.
Holi 2021 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!