दरवर्षी होळीच्या मुहूर्तावर आपण होलिकादहन करतो. त्यामागे असलेली पौराणिक कथासुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, मनात प्रश्न निर्माण होतो, की होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला, त्या होलिकेचे हजारो वर्षांपासून पूजा करण्याची प्रथा का आहे? आपण अजाणतेपणी चुकीच्या गोष्टीचे तर समर्थन करत नाहीये ना? होळीच्या दिवशी होलिका राक्षसीणीची आठवण का? याचे सुंदर उत्तर दिले आहे, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी...
होलिकेला वरदान होते, सद्वृत्तीच्या माणसांना तिने त्रास दिला नाही, तर अग्नी तिला जाळणार नाही. परंतु, हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून तिने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेतले. त्यादिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित केला आणि त्याने प्रल्हादाला जाळू नये अशी प्रार्थना केली.
प्रल्हादाने लोकहृदयाला जिंकले होते. अग्नीने लोकांची प्रार्थना ऐकली. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद अग्निदिव्यातून पार होत नरश्रेष्ठ झाला. प्रल्हादाला वाचवण्याच्या हेतून चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमामध्ये सामुदायिक पूजेत रुपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौकाचौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली. या दृष्टीने पाहता, होलिका पूजन हे असूर वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतीक आहे. म्हणूनच आनंदाने होलिकादहन केले जाते.
होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकांवर रंग, गुलाल उडवू लागली. शिवाय काहींनी धूळ उडायला सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवड निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धरतीवरील धूळ यांचे या त्सवात मीलन झाले आहे. लहान मोठा भेद विसरून, महालात आणि झोपडीत राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्त्व दिसते.
होळीमध्ये केवळ निकामी वस्तु किंवा लाकडे लाळली पाहिजेत असे नाही, तर आपल्या जीवनात असलेले, आपणास त्रास देणारे खोटे विचार, मनाचा मळ, विचारांच कचरा जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजेत. त्याबरोबरच उत्सवाला विकृतीचे गालबोट लागणार नाही, हे लक्षात घेऊन स्त्रिवर्गाशी आदरभावनेने होळी खेळली पाहिजे.