शहरी भागात सणाच्या निमित्ताने जेमतेम एक सुटी मिळते, ती सुद्धा मिळतेच असे नाही. त्यामुळे सुटी मिळेल तो सणाचा दिवस, हे समीकरणच तयार झाले आहे. एवढेच काय तर मंगळागौरीची पूजा जी श्रावणातल्या मंगळवारी केली जाते, तीसुद्धा हल्ली सुटी मिळत नसल्याने शनिवार-रविवार पाहून केली जाते म्हणजे काय ते बघा! अशात होळी, धुळवड, रंगपंचमी असे प्रत्येक दिवसागणिक वेगवेगळे सण साजरे करणे नोकरदार वर्गाला शक्य होत नाही. शिवाय सण उत्सवात बाजारपेठांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात चालत असल्याने व्यवसायालाही सुटी घेऊन चालत नाही. त्यामुळेच हे सगळे सण एकाच दिवशी साजरे करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो.
सुटीचा प्रश्न लक्षात घेता लोकांनी निवडलेला पर्याय त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, मात्र आपल्याला निदान त्या दिवसांचे महत्त्व तरी माहित असलेच पाहिजे. तरच आपण पुढच्या पिढीकडे ती संस्कृतीचे हस्तांतरण करू शकू. जाणून घेऊया तीनही दिवसांचे महत्त्व!
होळी: फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी करतात. भक्त प्रल्हादाला यादिवशी त्याच्या आत्याने होलिकेने अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. कारण तिला अग्नीचे भय नव्हते. मात्र प्रल्हादाला मारण्याचा हेतू चुकीचा असल्याने होलिकेला तिचे वरदान शाप रूप ठरले. त्याला मारण्या ऐवजी तीच भस्मसात झाली. सत्याची असत्यावर मात म्हणून तिच्या स्मरणार्थ ही तिथी होलिका दहन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होलिका दहन केले जाते. होळीत श्रीफळ अर्पण केले जाते.
धुळवड: होळीचा दुसरा दिवस धुळवड किंवा धूलिवंदन म्हणून साजरा केला जातो. गावाकडे धुळवड हा सण शब्दशः धूळ उडवून खेळला जातो. बालपणी जसे धुळीत खेळायचो, लोळायचो तसा आनंद पुन्हा अनुभवता यावा म्हणून हा सण! तर धुलिवंदन या नावानेही होळीचा दुसरा दिवस ओळखला जातो. त्यानुसार आदल्या दिवशी जाळलेली होळी आणि त्याची दुसऱ्या दिवशी झालेली राख एकमेकांना लावून हा सण साजरा केला जातो. मनातले विकार दूर होऊन सगळ्यांनी समपातळीवर येऊन सणाचा आनंद लुटावा आणि मातृभूमीशी आपली नाळ सदैव जोडलेली राहावी, हा त्यामागचा उदात्त हेतू असतो.
रंगपंचमी : यंदा १२ मार्च रोजी रंगपंचमी आहे. होळीपासून पाचवा दिवस म्हणजे फाल्गुन पंचमीचा दिवस रंगांची उधळण करून खेळण्याचा असतो. यावेळेस रंगपंचमी रविवारी आल्यामुळे तिथी आणि वार दोन्हीनुसार रंगपंचमीचा आनंद घेता येणार आहे. दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा बेताने सौम्य रंगांनी रंगून या सणाचा आस्वाद लुटावा. रासायनिक रंग लावून किंवा कोणाच्या मनाविरुद्ध रंगपंचमी खेळून सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तर भारतात फुलांची होळीदेखील खेळली जाते.
एकूणच होळीचा सण पंचमहाभूतांशी जोडणारा आहे. होलिका दहन करून अग्निपूजा करतो. मनात एखाद्याबद्दल राग असेल तर त्याच्या नावे शिमगा करतो. धुळवड खेळून मातृभूमीशी नाते प्रस्थापित करतो. रंग आणि पाण्याने कलुषित मन धुतले गेले, की सच्चेपणाचे तेज लेवून बरोबर १५ दिवसांनी उंचच उंच गुढी उभारून आकाशाशी नाते जोडतो.
आपण भारतीय उत्सव प्रिय असल्याने एक सण एक दिवस पुरणार नाही, हे जाणून धर्म शास्त्राने पाच दिवसांच्या सोहळ्याची आखणी केली असावी. सरते शेवटी आनंद महत्त्वाचा, मग तो पाच दिवसांचा असो, एक दिवसांचा नाहीतर एक क्षणाचा... तो पुरेपूर अनुभवणे गरजेचे आहे!