होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा! असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो. पण म्हणतात ना, सगळी सोंगं आणता येतील पण पैशांचे सोंग आणता येत नाही. म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही. हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिष शास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे. जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू. तो उपाय कोणता, त्याबद्दल जाणून घेऊ.
सुख-दु:खं, नफा-तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधी-कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही. अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो. तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग होऊ शकेल.
कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय
होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो. या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो.
या उपायाचा विधी
पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी. दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये. घरी जावे. हात पाय धुवून निजावे. होळीपासून सुरु केलेला हा उपाय सातत्याने सुरु ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आडरस्त्याला ठेवला तरीदेखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे!