Holi 2024: मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी परंपरा आहे. यंदाची होळी अनेकार्थाने विशेष ठरणारी असल्याचे सांगितले जात आहे. यंदा फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण असणार आहे.
फाल्गुन पौर्णिमेला होलिका प्रदीपन झाल्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस म्हटले जातात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन. होळी पेटल्यानंतर झालेली राख त्वचेसाठी उपयोग असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच शरद ऋतूनंतर सुरू होणाऱ्या वसंत ऋतूसाठी आपले शरीर तयार व्हावे, यासाठीही होळी महत्त्वाची ठरते. धुळवडीला रंगांनी खेळणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे, नाचणे याचा आपल्या शरीराला आणि मनाला उपयोग होत असतो, असे सांगितले जाते.
होळी: होलिका प्रदीपन, २४ मार्च २०२४
फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ: २४ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९ वाजून ५४ मिनिटे.
फाल्गुन पौर्णिमा समाप्ती: २५ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे.
भारतीय संस्कृतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे २५ मार्च २०२४ रोजी पौर्णिमा तिथी असून, होलिका प्रदीपन पूजाविधी २४ मार्च २०२४ प्रदोष काळानंतर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
होलिका प्रदीपन पूजनविधी कसा करावा?
होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांची आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते.
कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात
- होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे.
- चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही.
- सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये.
- होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता प्रचलित आहे.
होलिका दहनाची कथा
पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधीत झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून अभय होते. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही, असा एक वर प्राप्त होता. मात्र, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला, असे सांगितले जाते.