दिनांक २४ मार्च २०२४ रोजी होळी आणि फाल्गुन पौर्णिमा आहे. होळीची पूजा करण्याची प्रथा आपण पाळतोच. त्याबरोबरीने लक्ष्मी प्राप्तीसाठी फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजाही करा आणि भरघोस लाभ मिळवा.
२४ मार्च रोजी सकाळी ९. ५४ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार असून २५ मार्च रोजी दुपारी १२. २९ मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. कोणतीही तिथी ज्या दिवसाचा सूर्योदय पाहते त्या दिवशी ती तिथी ग्राह्य धरली जाते. यानुसार २५ मार्च रोजी पौर्णिमा म्हटली जाईल! परंतु पौर्णिमा ही तिथी चंद्राशी संबंधित असल्याने ती २४ चा चंद्रोदय पाहिल म्हणून होलिका दहन आणि लक्ष्मी पूजन २४ तारखेला करणेच उचित ठरेल.
पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी. अशातच फाल्गुनी पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. त्यात आळस, अंधश्रद्धा, अविवेक, अनैतिकतेरुपी असणारी अलक्ष्मी जळून जावी अशी प्रार्थना करतो. जेव्हा घरातून अलक्ष्मी काढता पाय घेते, तेव्हाच लक्ष्मीचे वास्तूत आगमन होते. तिने यावे, स्थिर राहावे आणि वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी पूजेचे महत्त्व सर्वार्थाने वाढते.
अशी करावी लक्ष्मीपूजा:
ही पूजा सायंकाळी करावी. स्नान करून शुचिर्भूत व्हावे. धुतलेले वस्त्र परिधान करावे. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची किंवा कुलदेवीची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. त्यावर नैवेद्य ठेवावा. त्याच्याभोवती पाणी फिरवून लक्ष्मीला तो अर्पण करावा. शांतपणे बसून आपल्याला येत असलेली लक्ष्मीची उपासना करावी. महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, महालक्ष्मी मंत्र म्हणावेत किंवा पाठ नसल्यास व्हिडीओ लावून शांत चित्ताने श्रवण करावेत.
या उपासनेमुळे लक्ष्मी संतुष्ट होते आणि भक्तांना शुभाशीर्वाद देते. त्यामुळे होळीच्या आणि फाल्गुन पौर्णिमेच्या औचित्याने ही उपासना चुकवू नका. लक्ष्मीपूजा करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करा.