Holi 2025: संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. होळी हा जनसामान्यांच्या सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. होळीला प्रामुख्याने रंगांची उधळण केली जाते. रंगांचा सण म्हणून होळीकडे पाहिले जाते. होलिकादहन झाल्यानंतर धुलिवंदनाला संपूर्ण देश विविध रंगांत रंगून जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही रंग हे नवग्रहांचे प्रतीक मानले जातात. होळी किंवा धुलिवंदनाला या रंगांचा वापर केल्याने अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. होळी पाच दिवस साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसांत एकमेकांवर रंग उडविण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धूलिवंदनाचा असतो. विशेष म्हणजे यंदाच्या होळीला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे.
ग्रहांचे प्रिय रंग अन् राशीनुसार रंगांचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांना काही रंग अगदी प्रिय असल्याचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार रंगांचा वापर केला, तर जीवनात आनंद आणि समृद्धीसह होळीची मजा द्विगुणित करता येऊ शकते. राशी आणि ग्रहांनुसार रंगांचे महत्त्व असते. काही मान्यतांनुसार, रंगांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व असते. रंगांचा वापर करून प्रतिकूल ग्रहांची अशुभ दृष्टी तसेच ग्रहदोषातून काहीसा दिलासा मिळू शकतो, असे म्हटले जाते.
कोणत्या ग्रहासाठी कोणते रंग वापरावेत?
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रहांचा राजा मानला गेलेल्या सूर्य ग्रहाची स्थिती कमकुवत असेल, तर लाल रंग आणि अबीर गुलालाचा वापर जास्त करावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अनुकूल नसेल तर पांढऱ्या रंगाचा अधिक वापर करावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत असेल तर होळी खेळताना लाल रंगाचा आवर्जून वापर करावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध प्रतिकूल असेल, तर हिरवा रंग वापरावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रहांचा गुरू म्हणजेच बृहस्पती गुरु ग्रह प्रतिकूल किंवा कमकुवत स्थितीत असेल, तर पिवळा रंग वापरावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र अनुकूल नसेल तर पांढरा रंग वापरावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि देव प्रतिकूल स्थानी किंवा कमकुवत स्थितीत असेल, तर काळा, निळा रंग आवर्जून वापरावा.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु ग्रहाची प्रतिकूल छाया असेल, तर फुग्यांमध्ये रंग भरून होळीचा आनंद घेऊ शकतात.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतु ग्रह अनुकूल नसेल, तर ते दोन रंगांचा मिश्रित वापर करू शकतात.
राशीनुसार कोणते रंग वापरावेत?
- मेष - लाल रंग.
- वृषभ - पांढरा रंग.
- मिथुन - हिरवा रंग किंवा गुलाल.
- कर्क - पांढरा रंग
- सिंह - लाल आणि नारिंगी रंग,
- कन्या - हिरवा रंग
- तूळ - पांढरा रंग.
- वृश्चिक - लाल रंग
- धनु - पिवळा आणि सोनेरी रंग.
- मकर आणि कुंभ - काळा किंवा निळा रंग
मीन - पिवळा रंग.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.