Holi 2025 Date And Time In Marathi: मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. २०२५ मध्ये होळी आणि धुलिवंदन कधी आहे. होळी सण का साजरा केला जातो? संपूर्ण देशात होळी सण साजऱ्या करण्याच्या विविध पद्धती कोणत्या? होळीची कथा काय? होळीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...
ओरिसा प्रांतात होळी पेटविण्याची प्रथा अजिबात नाही. तेथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. तसेच घरोघरी पूजा केली जाते. महाराष्ट्रातील मुंबई, कोकण तसेच गोवा प्रांतात होळी सण हा शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतात. होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते. होळीशी संबंधित अशी इतर प्रांतांमध्ये अकराहून अधिक व्रते, विधी केले जातात. काही प्रथा, परंपरा पिढ्यानुपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात. गुजरात, राजस्थान या भागांतही होळी सण साजऱ्या करण्याच्या पद्धती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत.
होळी व्रत, पूजनाची पद्धत
होळी हा जनसामान्यांच्या सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. त्यात धूलिवंदन म्हणजे मातीला, पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे. होळीला अग्नि पेटविला जातो, तो अग्नि घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापविण्याची प्रथा होती. फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रत कर्त्याने शुचिर्भूत होऊन ‘ढूंढा राक्षसिणीच्या पिडेचा परिहार व्हावा, म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो’, असा संकल्प प्रकट करावा. नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा ठोकाव्यात, असे सांगितले जाते. गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. १३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. तर, शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजून २३ रोजी पौर्णिमा समाप्त होत आहे. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते.
धरतीमातेला वंदन, देशभक्तीचे द्योतक असलेले सणांचे पंचक
होळी पाच दिवस साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसांत एकमेकांवर रंग उडविण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धूलिवंदनाचा असतो. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन. धूलिवंदनाला म्हणजे जमिनीला-मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राणिमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतांत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे. धरतीमातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे, असे म्हटले जाते.
एक महिनाभर सुरू होते होळीची तयारी
माघी पौर्णिमा, म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या, पेंढा इ. जमा करावयास आरंभ होतो. होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धूळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो. होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी आपली परंपरा आहे.
होळीची कथा
प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंढा हिलाच काहीजण होलिका म्हणतात. हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून अग्नि पेटवण्यात आला. मात्र झाले ते उलटेच! भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या प्रीत्यर्थ हा होलिकादहन विधी करण्याची प्रथा पडली. इतरही काही कथा होळीसंबंधात सांगितल्या जातात.