धर्मसिंधुसारख्या धर्मग्रंथातही वरील प्रश्नाचा उहापोह केलेला आढळत नाही. कारण धर्मशास्त्रग्रंथाची निर्मिती झाली त्यावेळची परिस्थिती एकदम निराळी होती. प्रत्येकजण देवपूजा, वाचन, जपजाप्य यासाठी सकाळचा वेळ काढून ठेवत असे. लोकसंख्येच्या भरमसाठी वाढीमुळे आता फक्त जगण्यासाठी झगडणे एवढेच बहुसंख्य लोकांच्या हातात राहिले आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन हा मोठा प्रश्न उद्भवल्यामुळे जपजाप्य कधी करायचे, हा देखील प्रश्न उद्भवला आहे. 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूया.
सद्यस्थितीत वाईटात एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे देवाधर्माविषयी बुद्धी व ईश्वराविषयी आस्तिक्यभाव दिवसेंदिव वाढत आहे. त्यामुळे मिळेल त्या थोड्या वेळात काही तरी करावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. अशा वेळी मग नाना प्रश्न उद्भवतात. घरी तर श्वास घेण्याइतकी फुरसत मिळत नाही. मग फक्त प्रवासात मिळणारा वेळ सत्कारणी लावता येईल का? या थोड्याशा वेळात एखादी पोथी वाचावयास काय हरकत आहे? हे प्रश्न रास्त आहेत. फक्त शास्त्राधार मिळाला की हे प्रश्न सुटू शकतात.
पण त्यासाठी गहन काथ्याकुट करण्याची काहीच आवश्यकता नाही. थोडेसे शास्त्र माहित असले तरी चालते. वैदिक मंत्र, बीजमंत्र, तांत्रिक तंत्र, मालामंत्र इ. मंत्रांचे पुरश्चरण घरात एकाच जागी बसून करावे लागते. त्याचप्रमाणे वैदिक सूक्ते व तत्सम गुरुचरित्रासारखे महाप्रभावी प्रसादिक ग्रंथही एकाच जागी बसून वाचावे लागतात. पण नाममंत्राचा जप, सोऽहं जप व प्राकृत पोथ्यांचे वाचन कोणत्याही ठिकाणी करता येते. विशेषत: वैखरी वाणीने म्हणजे मोठ्याने केलेल्या जपाचा कालांतराने मध्यमेत म्हणजे पुटपुटण्यात प्रवेश होतो. कालांतराने तो परेला भिडतो. परावाणी म्हणजे मानसिक जप होय. ज्यावेळी थोडा निवांत वेळ मिळेल त्यावेळी परावाणीने अवश्य जप करावा. परावाणीने नाही तर किमान मनातल्या मनात जप करावा.
गाडीत वाचन करण्यासारखी परिस्थिती असेल तर अवश्य वाचन करावे. हल्ली दररोज प्रवास करणारे लोक आपले आह्निक गाडीतच उरकतात. घरात फक्त देवपूजा होते. रिकाम्या वेळेत डोक्यात व्यावहारिक व प्रपंचाचे विचार आणून मन:शांती बिघडवून घेण्यापेक्षा सरळ प्राकृत ग्रंथांचे वाचन करावे. ज्यावेळी मनात अमंगळ भावना निर्माण होण्यासारखी स्थिती असते किंवा एखादे वाईट दृष्य दिसून मन विचलित होते, तेव्हा हातपाय धुवून आचमन करावे.
प्रवासात आचमनासाठी पळीभांडे, ताम्हण यांची आवश्यकता नसते. उजव्या कानाला हाताने स्पर्श करणे हेदेखील श्रोत्राचमन होय. हे शुद्ध भावनेने करावे. तसे करून 'आपण शुद्ध आहोत' अशी तीव्र भावना करून आपले नेहमीचे वाचन, मनन, चिंतन, जप इ. आह्निक करावे. मुंबई पुणे सारख्या शहरातले लोक लोकल ट्रेन, बसमध्ये धर्माचरण करतात. ज्यावेळी एखादी प्राकृत पोथी तोंडपाठ होते, त्यावेळी हातात पुस्तक घेण्याचीही गरज लागत नाही. थोड्या सरावाने आपले नित्यकर्म करूनही नामस्मरण व मनोमन स्तोत्रपठण केल्याचे फलही मिळते. थोड्याशा सवयीने मनात नामस्मरण व देहाने प्रपंचा या गोष्टीतून सहज सुलभ होतात. प्रवासात जप करायचा असेल, तर जपमाळेचा वापर केला असता ते प्रदर्शनीय ठरेल. अशा वेळी बोटावरील पेरांचा वापर करावा. नाम होईल आणि काम पण होईल, नाही का? शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं...
नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा।।
अर्थात, जिथे असाल तिथे मनापासून देवाचा धावा करा, तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच!