दगडावर एकाचवेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल. पण त्यावर सतत एकाच बिंदूवर थेंबाथेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दु:खाचा दगड फुटून जातो.
संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, भगवंत प्राप्तीच्या सर्व प्रकारांपेक्षा सोपा प्रकार आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा! `नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' या अभंगात तर ते म्हणतात, नामस्मरणाने सकल पापांचा नाश होतो, सकल दु:खाचा विसर पडतो. ते घेण्यासाठी फार कष्ट लागत नाही. वनात जावे लागत नाही. व्यावहारिक कामे करता करताही मुखाने अखंड नामस्मरण करता येते. नामस्मरण कोणाचे करावे असा ठराविक नियमही नाही. आवडी अनंत आळवावा, म्हणजे ज्या देवतेची उपासना करता, त्याचे मनोभावे नाम घ्या. नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.
- स्वार्थबुद्धीचा त्याग करावा.
- यम नियमांचे पालन करावे.
- परान्न घेऊ नये.
- परनिंदा करून नये.
- दयाबुद्धी ठेवावी.
- कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात.
- कितीही त्रास झाला तरी शांत राहावे.
- मांसभक्षण, मदिरापान, व्यसन इ. निषिद्ध कर्म करू नयेत.
- जप सद्गुरू करून घेत आहेत, ही भावना ठेवावी.
- शिव आणि नारायण यांच्यात भेद करू नये. सर्व देवांमध्ये परमतत्त्व पाहावे.
- मासिक पाळीच्या काळात जपाची माळ न घेता केवळ मुखाने नामस्मरण करावे.
- रोज शिवकवच, पंचमुखी हनुमान कवचाचे किंवा कोणत्याही एका स्तोत्राचे नित्यनेमाने पठण करावे.
- परस्त्रीला मातेसमान मानावे.
- दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ठेवू नये.
- संशय, विकल्प आले, तरी नामस्मरण सोडू नये.