भारताने जगाला अनेक मौलिक गोष्टी दिल्या. पैकी एक आहे आयुर्वेद. प्राचीन काळापासून आयुर्वेदाचा अभ्यास आणि संशोधन सातत्याने सुरु आहे. या शास्त्राची ताकद पाश्चात्त्यांनी जाणून घेत इथले अनेक दुर्मिळ ग्रंथ गहाळ केले आणि तेच मेडिसिन स्वरूपात चकचकीत आवेष्टन गुंडाळून आपल्यापर्यंत पाठवले. त्यामुळे आपण आपली मूळ परंपरा विसरून आयुर्वेदकडे दुर्लक्ष होतो. परंतु, अलीकडच्या काळात लोक पुन्हा आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत. तसे असले, तरी गेल्या वर्षभरातील कोरोना काळात आयुर्वेदाकडून ठोस पावले का उचलली गेली नाहीत? एखादा रामबाण उपाय का सुचवला गेला नाही? या महामारीत आयुर्वेद कुठे कमी पडले, यासारखे अनेक प्रसन्न डोके वर काढतात. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि आयुर्वेदाची बाजू समजावून घेण्यासाठी २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेत्री खुशबू तावडे त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
या संवादाच्या निमित्ताने आपणही आयुर्वेदाचा सविस्तर परिचय करून घेऊया. या चर्चासत्रात आपणही सहभागी व्हा. विषय : आयुर्वेदाचा लढा कुठंपर्यंत?दि. २३ जानेवारी २०२१, दुपारी ३ वाजता