ज्योत्स्ना गाडगीळ
'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' असे पूर्वी म्हटले जात असे. कारण, तेव्हा खऱ्या अर्थाने साधू-संतांचा समाजात वावर होता. मात्र, सद्यस्थितीत स्वयंघोषित संतांची, गुरुंची संख्या एवढी वाढली आहे, ती पाहता संतांची ओळख पटावी तरी कशी? हा संभ्रम दूर करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य निळोबा राय म्हणतात,
तेचि संत, तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठली।नेणति काही जादूटोणा। नामस्मरणावाचोनि।।
सर्वात पहिली गोष्ट, संत कधीच स्वत:ला उपाधी देत नाहीत, तर लोक त्यांचा संत म्हणून गौरव करतात. परंतु, अलीकडच्या काळात लोकांवर अंधश्रद्धेचा एवढा पगडा आहे, की ते जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला साधू-संत म्हणू लागले आहेत. संतांच्या ठायी जादू करण्याची किमया आहे, परंतु ही जादू व्यावहारिक जगाची नाही, तर पारमार्थिक जगाची आहे. त्या जादूचा प्रभाव अखंड टिकणारा आहे. असे संत समाजाची दिशाभूल करत नाहीत, तर विठ्ठलनामाची गोडी लावतात, सन्मार्गाची वाट दाखवतात आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हे पटवून देतात.
हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा, अशी तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करून ठेवली आहे. असे लोक जे निर्हेतुकपणे जनसेवा करतात. स्वत:जवळ कितीही ज्ञान असले, तरी त्याचे प्रदर्शन करत नाहीत, तर त्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी उपयोग करतात.
संत ज्ञानेश्वर यांना सर्व संतांनी एकमुखाने माऊली म्हटले आहे. कारण, त्यांनी समाजाचा रोष पत्करूनही प्रेमाची परतफेड केली. सर्वसामान्य लोकांना भगवद्गीतेचे मर्म कळावे, म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली. साध्या साध्या गोष्टी सोदाहरण समजावून सांगितल्या. जड बुद्धीच्या रेड्यासारख्या लोकांकडून वेद वदवून घेतले. भिंतीसारख्या थिजलेल्या समाजात चैतन्य निर्माण करून समाजाला गती दिली. अमृतानुभव दिला. अभंगरचना केली. विठ्ठलाशी सोयरिक निर्माण करून दिली, तरीदेखील या कार्याचे श्रेय आपल्या गुरुंना देताना आपल्याकडे उणेपणा घेतला. गुरुकृपेने आपल्या आयुष्यात मोगरा फुलला, अशी ते ग्वाही देतात.
ही विनम्रता संतचरित्राचे दर्शन घडवते. संत वृत्ती सापडणे दुर्मिळ. परंतु संतविचारांचे आचरण करणे, शक्य आहे. याकरिता आधी संतचरित्राचा आढावा घ्या आणि मगच संतांच्या विचारांचे अनुसरण करा, अशी विनवणी निळोबा राय करतात. जय हरी!
हेही वाचा : देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.