- बा. भो. शास्त्रीजुनी पिढी गोष्टी ऐकून मोठी झाली. आताची पिढी कार्टून पाहात मोठी होत आहे. गोष्टीत संसार, शेतकरी, राजा, शिकारी, भिकारी असे अनेक विषय असतात. तिचं तात्पर्य कुठलातरी ज्ञानाचा पैलू सांगून जातो. काय करावं, काय करू नये हे त्यात सांगितलं जातं. ग्रामीण भागात गोष्ट सांगणारे काही गोष्टीवेल्हाळ माणसं असत. त्यांचा अभिनय, शब्दफेक, आवाजाचे चढ-उतार, गोष्टीनुसार विषयाला अनुकूल रसाविष्कार ते करीत असत. एकच गोष्ट तीन-चार तास चालायची. दोन तासांची करमणूक करणारा चित्रपट करोडो रुपये खर्च करून तयार होतो. गोष्ट स्वस्त असायची. आजच्या कथाकथन, एकपात्री प्रयोगांचा उगम तिथूनच झाला आहे. मनावर चांगले संस्कार त्यातून मिळत होते. एक आटपाट नगर होतं, इथून प्रत्येक गोष्ट सुरू होते. सर्वज्ञ गोष्टीवेल्हाळ होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा स्वतंत्र ग्रंथ आहे. एकदा नागदेव आणि पाठक दोघांची एकांतात चर्चा रंगली. ती तर्कवितर्काने वादरूप झाली. चर्चेचं भांडणात रूपांतर झालं. तुला काही येत नाही, असे दोघेही परस्पराला म्हणत होते. तेवढ्यात सर्वज्ञ तेथे गेले आणि चर्चेचं स्वरूप सुसंवादी असावं, त्याचं फलित कसं असावं यावर एक सुंदर सूत्र सांगितलं, ‘सुख: श्रेय: शृंगारु इये तीनि नाही ते काईगा गोष्टी ते अरण्यरुदन की’. चर्चा, मंथन, वार्ता, कथा, कहाण्या ही गोष्टीचीच रूपं आहेत. गोष्टीचं स्वरूप, लक्षण सांगताना सुख, श्रेय आणि शृंगार त्यात असावेत, नसता गोष्टीचं अरण्यरुदन होतं. सांगणाऱ्या, ऐकणाºया आणि पाहणाºया सगळ्यांना ती सुखद वाटावी, समाधान देणारी असावी. नवीन ज्ञान मिळाल्याचं सुख, मौलिक इतिहास कळल्याची तृप्ती लाभली पाहिजे. आता चॅनेलवरील बातम्या ऐकून थोडंसं सुख पदरात पडतं, दु:ख डोंगराएवढं मिळतं. माणसं अनावश्यक चर्चा करतात. नवीन चित्रपटसृष्टीने नैतिकता पायदळी तुडविलेली आहे. त्यातून माणूस घडतो, असं वाटत नाही. वैभव आलं; पण सुख विरळ झालं.
गोष्ट कशी असावी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 4:26 AM