देव दैत्यांच्या युद्धात दैत्यांचे पारिपत्य झाल्यावर देवांनी एकच जल्लोष केला. परंतु आनंदाचा पूर ओसरल्यावर उपस्थितांमध्ये श्रेय घेण्यासाठी वादावाद झाल़े प्रत्येकाला वाटे, युद्ध आपल्यामुळे जिंकले. श्रेय आपल्याला मिळायला हवे. असे प्रत्येक जण श्रेय घेऊ लागल्याने त्यांच्यात युद्धजन्य स्थिती उद्भवली. तेव्हा तिथे मोठ्याने गर्जना होत एक तेजस्वी शक्ती प्रगट झाली. त्या शक्तीने भूमीपासून नभापर्यंतची जागा व्यापून टाकली. त्या शक्तीचे तेज कोटीसूर्यांपेक्षा अधिक प्रखर होते. ते पाहता देवांची गाळण उडाली.
सगळेजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. आपल्यापेक्षा दिव्य अशी ही शक्ती कोणती, हे कोणालाच ओळखता येईना. तेव्हा शक्ती आणि अग्नीचा संबंध नजीकचा असल्याने देवांनी अग्निला चौकशी करायला सांगितली. अग्नीदेव शक्तीजवळ गेले आणि विचारले, `कोण आहेस तू?' त्या शक्तीने प्रतीप्रश्न केला, `हे विचारणारा तू कोण आहेस?' अग्नीदेव अपमानित झाले. त्यांनी ओळख दिली, माझ्यासमोर कोणीही टिकू शकत नाही, मी कोणालाही भस्मसात करून टाकू शकतो. कारण मी अग्नी आहे.'
ती शक्ती म्हणाली, `ठीक आहे, मग बाजूला असलेली गवताची पाती जाळून दाखव.' अग्नीदेवांनी आव्हान स्वीकारले आणि त्या गवताच्या पातीवर सगळे सामथ्र्य ओतले. परंतु ती गवताची पात आदिशक्तीच्या छत्रछायेत असल्यामुळे अग्नीदेव तिचे काहीच बिघडवू शकले नाहीत. ते खाली मान घालून परतले. त्यानंतर वायुदेव गेले. तेही गवताची पात हलवूसुद्धा शकले नाहीत.
नंतर इंद्रदेव गेले. ते जाताच दिव्यशक्ती अंतर्धान पावली. इंद्राला तो अधिकच अपमान वाटला. त्याने त्या शक्तीला भेटीचे आवाहन केले. ती शक्ती सुवर्णमूर्तीत उमा नावाने प्रगट झाली. तिने इंद्राला सांगितले, `तुम्ही सगळे देव आपापसात भांडत राहिलात तर पृथ्वीवरील जीवांचे रक्षण कोणी करायचे? आदिशक्तीच्या सहकार्याशिवाय तुमची शक्ती अपुरी आहे, हे मान्य करा आणि तुम्हाला सोपवलेले कार्य पूर्ण करा.' हे ऐकून इंद्राचा आणि समस्त देवांचा अहंकार गळून पडला. त्या दिव्यशक्तीसमोर सगळे नतमस्तक झाले आणि सर्वांना जाणीव झाली की केवळ इंद्रिय मिळून उपयोग नाही, चेतना हवी; केवळ देह मिळून उपयोग नाही, त्यात आत्मशक्ती हवी; ही सृष्टी मी चालवतो हा अहंकार बाळगून उपयोग नाही, तर या सृष्टीला कार्यन्वित करणारी शक्ती हवी. त्या शक्तीविना आपण अपूर्ण आहोत. असे म्हणत सर्वांनी देवीचे आभार मानले आणि आपल्याला सर्व चेतनांसह मिळालेल्या देहाचे, विचारशक्तीचे आणि कार्यशक्तीचे ऋण व्यक्त केले.
म्हणून आपणही वृथा अहंकार न बाळगता `बोलविता धनि वेगळाचि' हे ध्यानात ठेवून आपले विहित कार्य करावे, हे इष्ट!