आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत आहेत, असे जुने जाणकार लोक नेहमी म्हणतात. ज्यांना संस्कृत बोजड वाटत असेल त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीसकट गीतेचे शेकडो भावानुवाद मराठीत उपलब्ध आहेत. ते वाचून प्रत्येक वाचकाने रोज 'एक तरी ओवी अनुभवावी' असा नामदेव महाराज आग्रह धरतात. परंतु ज्यांनी हा गीताग्रंथ आजवर उघडूनच पाहिला नाही किंवा ज्यांना तो वाचण्याआधीच अवघड वाटतो, अशा लोकांना पुढील प्रसंग नक्कीच बोधप्रद ठरेल. हा प्रसंग समाज माध्यमावर वाचनात आला. लेखक अज्ञात आहेत परंतु त्यांनी सांगितलेला किस्सा खूप सुंदर आहे, शेवट्पर्यंत जरूर वाचा!
आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली.
मला फार प्रसन्न वाटत होतं की पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या.
सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय "गीतासार ", त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या.
मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं, 'काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही !!'
ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, "अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं? आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने आम्हाला, सास-यांनी जेवायला बोलावलंय हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा ? हाच कर्मयोग !! आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे !!'
माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं ! पाहुणे पुढे म्हणाले, 'तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून, किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना?'
मुलीला हे सगळं छान पटत होतं! 'नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं. हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा !!'
काकांचं बोलणं पटकन कळल्या मुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावसं वाटत होतं. मी ही थक्क झाले.
मग काका म्हणाले, 'आता आणखी एक गंम्मत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते व प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा ?''हो, पण त्यात काय नवीन!' .. मोकळेपणाने कन्या विचारती झाली. 'अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग !! समोर जर देण्या योग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक, आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय !!'
गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते,विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर !
आहे ना सुंदर प्रसंग? आपल्यालाही गीता न वाचता तीन अध्यायांचे सहज अवलोकन झाले. या छोट्याशा प्रसंगाने एवढा आनंद दिला, तर सबंध गीता वाचण्यात, समजून घेण्यात किती आनंद मिळू शकेल याची कल्पना करा. अशा अवघड गोष्टी सोप्या करून सांगण्याची हातोटी फक्त गुरूंकडे आणि संतांकडे असते. आपल्या जड बुद्धीला पचेल, रुचेल अशा भाषेत ते आपल्याला ज्ञानामृत देत असतात. आपण किमान त्या ज्ञानगंगेच्या काठापर्यंत पोहोचण्याची तयारी दर्शवायला हवी. बाकी भवसागर पार करण्याचे काम गुरु करतात.