रोज सकाळी वेळेत जाग यावी, म्हणून आपण सगळेच अलार्म लावून झोपतो. किती वाजता उठतो, हे महत्त्वाचे नसून ठरवलेल्या वेळात आपण उठतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अलार्म ठरवलेल्या वेळेत होतो, मात्र तो बंद करणारे लोक चार प्रकारचे असतात. कोणते ते पहा,
एक वर्ग असा आहे, जे अलार्म लावतात, परंतु तो कितीही वाजला, तरी ते उठत नाहीत. अलार्मच्या आवाजाने बाकीचे उठतील, पण अलार्म लावणारी व्यक्ती निश्चिंत झोपलेली असते.
हेही वाचा : रोज सकाळी उठून कराव्यात अशा पाच मुख्य गोष्टी, सांगताहेत गौर गोपाल दास!
दुसरा वर्ग असतो, त्यांना अलार्म वाजलेला कळतो. ते उठतात, आणखी दहा मीनिटांची वेळ वाढवतात आणि झोपतात. अशा लोकांच्या मोबाईलमध्ये या वाढीव वेळेची देखील वर्गवारी केलेली असते. पाच मीनिटे, दहा मीनिटे, पंधरा मीनिटे किंवा अर्धा तास. त्यानंतर अलार्म थांबतो आणि लोक उठतात.
तिसऱ्या वर्गातले लोक अलार्मच्या आवाजाने उठतात, त्यांना जाग येते, डोळे उघडतात पण अंथरुणातून उठायचा आळस करतात. ते बराच वेळ जागे राहतात, विचार करतात, दिवसभराच्या कामांची मनातल्या मनात आखणी करतात आणि पडल्या पडल्या पुढचा अलार्म लावून झोपी जातात.
चौथा वर्ग मात्र अलार्म होताच क्षणी तो बंद करून उठतो. आवरतो, दिवसभराच्या आखलेल्या कामांची सुरुवात करतो. एकदा उठल्यावर रात्रीपर्यंत पुन्हा अंथरुणाकडे पाहतही नाही.
या चार वर्गांपैकी आपण कोणत्या वर्गात मोडतो, हे एव्हाना आपले तपासून झाले असेल. परंतु, यावरुन व्यक्तिमत्त्व कसे ओळखायचे, असा प्रश्न पडला असेल, तर यावर गौर गोपाल दास छान स्पष्टीकरण देतात.
अलार्म दोन प्रकारचे आहेत, पहिला झोपेतून जागे करणारा आणि दुसरा वास्तवाची जाग आणणारा. आपल्याला केवळ सकाळपुरता विचार करायचा नाही, तर सुप्तावस्थेतही जागृत राहायला शिकायचे आहे.
पहिला वर्ग, ज्यांना अलार्म वाजलेला ऐकू येत नाही, हे लोक आयुष्यात अडचणी दिसूनही परिस्थितीकडे डोळेझाक करतात. मात्र, अशाने समस्या कमी होत नाहीत, तर उलट वाढतात.
दुसरा वर्ग, अलार्म बंद करून पुन्हा पुन्हा झोपणारा. असे लोक कामाची टाळाटाळ करतात. त्यांना वास्तवाचे गांभीर्य कळते, परंतु त्याला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नसते. म्हणून ते केवळ चालढकल करत राहतात.
तिसरा वर्ग, अलार्म झाल्यावर जाग येणारा परंतु काही क्षणात झोपणारा. अशा लोकांना परिस्थिीची जाणीव होते. ते नव्या उर्जेने कामाला लागतात. सकारात्मकतेने नवनव्या आव्हानांना तोंड देतात. परंतु, काही अडचणी आल्या, की त्यांच्यातला उत्साह मावळू लागतो आणि ते नैराश्याने ग्रासून प्रयत्न सोडून देतात.
आणि चौथा वर्ग, अलार्म वाजल्यावर उठून कामाची सुरुवात करणारा. असे लोक ठरवलेली कामे चोखपणे पार पाडतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी ते न डगमगता त्यांना सामोरे जातात. योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य जीवनशैलीचे अनुसरण करतात. असे लोक केवळ स्वत:ची नाही, तर आपल्याबरोबर इतरांचीही प्रगती करतात.
आपल्यालाही चौथ्या वर्गात सामील व्हायचे आहे. आत्मोन्नती करून घ्यायची असेल, तर आपल्याला वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपण जर वेळ पाळली, तर निश्चितच आपलीही चांगली वेळ येत राहील.
हेही वाचा : नाती जपायची असतील, तर दर्शनीय परिस्थितीमागील वास्तव बघायला शिका.