बालपणी झालेले संस्कार आपण सहसा विसरत नाही. रोजच्या कामाच्या गडबडीत उजळणी होत नाही ही बाब वेगळी, परंतु काही प्रसंगामुळे श्लोक, परवचा, सुभाषिते, हरिपाठ यांचा आठव होतो. कारण बापूनी या गोष्टी आपल्या बुद्धीवरच नाही तर मनावरही कोरल्या जातात. तशीच एक प्रार्थना जी आपण शाळेत आणि घरी आजीकडून शिकलो, ती म्हणजे -
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडोकलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडोसदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडोवियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो
ही मोरोपंतांची केकावली आहे. त्याची आणखीही कडवी आहेत. काही जणांना ती पाठ असतात, तर काही जणांना पहिला श्लोक स्मरणात राहतो. श्लोकाच्या पहिल्या ओळीत केवढी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. सुसंगती सदा घडो... आजच्या काळात चांगली सोबत मिळणे अतिशय कठीण! खुषमस्करी करणारे लोक अवती भोवती असून उपयोगाचे नाही. चांगल्या बाबतीत कौतुक करणारे आणि चुकल्यास कान धरणारी ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी आपल्या बरोबर असतील तर आणि तरच विकास होऊ शकेल. या श्लोकाच्या पहिल्या ओळीइतकाच पूर्ण श्लोकाचा आशय सुद्धा महत्त्वाचा. तो लक्षात ठेवला तर कितीही अडचणी आल्या तरी आपले पाऊल वाकडे पडणार नाही, याची गॅरेंटी!
श्लोकाचा अर्थ आहे, मला सज्जनांचा सहवास घडो, अनुभवी लोकांचे शब्द कानी पडो, सज्जनांच्या मदतीने बुद्धी निष्कलंक होवो. प्रपंचाची ओढ कमी होऊन संत सहवास घडो. त्यांनी दूर लोटले, तरी हट्टाने त्यांचेच सान्निध्य मिळो. त्यासाठी दुःखं कष्ट झाले तरी चालतील, त्याचा शेवट ईशसेवेत रुजू होण्यातच असेल.
मराठी साहित्य एवढे समृद्ध आहे ना, की इथे सारस्वतांचा सुकाळ आहे. माउलींच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, समर्थांचे समास, कबीरांचे दोहे, मोरोपंतांच्या केकावल्या, आर्या आणि बरेच काही. हा समृद्ध वारसा आपल्याला मिळाला आणि आपल्या पूर्वजांनी तो जतन केला. आपल्याला तो वृद्धिंन्गत करायचा आहे. केवळ पोपटपंची करून नाही, तर त्याचे मर्म जीवनात उतरवून!