घरोघरी पूर्वी मातीच्या चुली होत्या, शेगड्या होत्या. त्यानंतर रॉकेलचे स्टोव्ह त्यांच्या जोडीला आले. नंतर विद्युत शेगड्या आल्या आणि आता तर घरोघरी गॅसच्या शेगड्यांचा तसेच इंडक्शनचा प्रामुख्याने वापर होत आहे.
चूल इतिहास जमा झालेली असली, तरी तिच्या पूर्वस्मृती जुन्या मंडळींच्या मनात अजूनही जागत्या आहेत. एवढेच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची फॅशन नव्याने रूढ होताना दिसत आहे. जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो ती चूल. मग तिचे स्वरूप पारंपरिक असो नाहीतर आधुनिक. तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.
अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे.
स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली की पूर्वी स्त्रिया शेणाने चूल सारवून ठेवत. दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरु करण्याआधी दोन बोटं रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत. अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी चार शिते त्यावर किंचित तूप टाकून प्रथम ते चुलीतील अग्नीत टाकत असत. हा दैनंदिन कुलाचार होता. चुलीला देवत्त्व दिल्यामुळे सुतकासारख्या दिवसात तिला शिवत नसत. तसेच तिला पायही लावत नसत. लग्नकार्यापूर्वी घरोघरी विटांची मोठी चूल म्हणून चुला घालीत किंवा राना वनात आवळी भोजन , मारग मळणे अशा प्रसंगी प्रसंगी तात्पुरती चूल मांडून त्यावर अन्न शिजवत असत.
आज या पद्धती शिल्लक नाहीत. गॅस किंवा तत्सम आधुनिक उपकरणांमुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झाली. परंतु त्यामागेही शक्ती आहेच. त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी नाही, तर निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडीला स्पर्श करून कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो. गृहप्रवेश, वास्तुशांतीच्या वेळी आजही शेगडीचे पूजन होते. परंतु मंगलप्रसंगी, सण वारी आठवणीने तिची पूजा करावी. हात जोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नयेत अशी प्रार्थना करावी.
निर्जीव वस्तुंना कळत नाही असे आपल्याला वाटते, परंतु भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे, की तिने आपल्याला चराचरात परमेश्वर पहायला शिकवला आहे. अशा उदात्त संस्कृतीचा आदर बाळगून छोट्या कृतीतून मोठी परंपरा आपल्याला नक्कीच जतन करता येईल.