आपल्या धर्मशास्त्रात अनेक प्रासादिक स्तोत्र आहेत, जी पठण केल्याचे खूप फायदे होतात. उदाहरणार्थ विष्णुसहस्त्रनाम! हे स्तोत्र नित्य पठण केल्यामुळे सर्व प्रकारच्या पापातून आपली मुक्तता होते आणि भविष्यातही वाईट विचार मनात येत नाहीत की वाईट कृत्येही हातून घडत नाहीत. यासाठी दररोज नाहीतर किमान दर एकादशीला विष्णूसहस्त्रनाम म्हणायला किंवा ऐकायला सांगितले जाते. पण मुद्दा असा येतो, की हे स्तोत्र रचले कोणी आणि लिहिले कोणी? याबाबत एक कथा सांगितली जाते. ती कथा पुढीलप्रमाणे आहे-
आपल्याला दर वेळी प्रश्न पडतो, पांडवांपैकी अर्जुन, युधिष्ठीर, भीम, नकुल यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. मात्र सहदेवाबद्दल विशेष बोलले किंवा सांगितले जात नाही. परंतु अलीकडेच वाचनात आलेल्या कथेनुसार सहदेवाने जे काम केले आहे, ते पाहता त्याचे समस्त मानवजातीवर अनंत उपकार आहेत, असेच म्हणावे लागेल. ते उपकार कोणते, हे जाणून घेऊ.
महाभारतातील अनुशासन पर्वातील १३५ वा अध्याय हा विष्णुसहस्त्रनामाचा आहे. भीष्मांचार्य जेव्हा शरपंजरावर पडलेले होते तेंव्हा श्रीकृष्णांनी धर्मराजास भीष्मांचार्यांनकडून धर्मविषयक ज्ञान घेण्यांस सांगितले. सर्व पांडव श्रीकृष्णांसह भीष्मांनकडे आले. भीष्मांनी श्रीकृष्णास हात जोडून त्यांची स्तुती गायला सुरवात केली. ती स्तुती ईतकी मंत्रमुग्ध होती की सगळे भारावून ऐकत होते. जेंव्हा स्तुतीपूर्ण झाली भीष्मांनी श्रीकृष्णाचा जयघोष केला तेंव्हा सगळे भानावर आले.
भीष्मांना नमस्कार केला व सगळे परत फिरले. युधिष्ठिर म्हणाला ही स्तुती कोणाच्या लक्षात कशी राहणार लीहून ठेवायला हवी. त्यांने तेथे आलेल्या प्रत्येकाला विचारल. जो तो म्हणू लागला आम्ही ऐकण्यातच तल्लीन होतो. आता काय करायचं? सगळे श्रीकृष्णाकडे गेले.त्यांस म्हणाले.तुला माहित असेल तू सांग.
श्रीकृष्ण म्हणाला नाही मी तर भीष्मपितामहांचे बोलणे ऐकण्यात गुंगलो होतो. एक भक्त माझी एवढी स्तुती गात होता ती ऐकत होतो. युधिष्ठिर म्हणाला आता तुच मार्ग सुचव. श्रीकृष्ण म्हणाला हे काम सहदेव करु शकेल.
श्रीकृष्ण म्हणाले, सहादेवा तू देवाधिदेव महादेवाची पुजा करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले आहेस. त्यांनी तुला एक माळ दिली, जी तुझ्या गळ्यात आहे. त्या मण्यांवर सर्व कोरले आहे. ते तू पाहू शकशील व लीहून घेतील लेखनिक. सहदेवांनी शंकराची आराधना केली. त्याला त्या माळेवर दिसू लागले व हे श्रीविष्णूसहस्त्रनाम आपल्याला मिळाले. आहे की नाही हे मोठे काम? येत्या चतुर्मासात आपणही या रोज विष्णुसहस्त्रनाम म्हणण्याचा किंवा रोज ऐकण्याचा संकल्प करूया आणि हे स्तोत्र लिहून ठेवल्याबद्दल सहदेवाचे मनोमन आभार मानूया.