भूक लागली की आपली हातातोंडाची गाठ पडते. परंतु, ही सवय योग्य नाही. स्वतःवर संयम हवा. आधाशाप्रमाणे अन्नग्रहण करणे उचित नाही. म्हणून समोर पंचपक्वान्नयुक्त ताट असो नाहीतर पिठले भाकरी, दोन वेळचे जेवण ज्याच्या कृपेने मिळत आहे, त्या अन्न दात्याचे म्हणजे परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे आणि ते शिजवून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायचे संस्कार आपल्यावर घातले आहेत. म्हणून 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हणून ईश्वरत्त्व त्या अन्नात मिसळल्यावर आपण अन्न सेवन करतो. याबरोबरच आणखीही काही नियम भारतीय संस्कृतीने सांगितले आहेत. त्यापैकी मुख्य नियम १० नियम पुढीलप्रमाणे-
>> जेवताना पायात चप्पल, बूट घालू नये. भारतीय संस्कृतीत पाटावर मांडी घालून बसण्याची प्रथा आहे. मात्र पाश्चात्य संस्कृतीत टेबल खुर्चीचा वापर केला जात असल्याने जेवताना सर्रास पादत्राणे घातली जातात. परंतु आपण अन्नाला पूर्णब्रह्म मानतो, म्हणून त्याचा अपमान होऊ नये याकरिता चप्पल, बूट यांचा जेवताना वापर टाळावा. तसेच चपलेला लागलेली माती, घाण जेवणाच्या ठिकाणी येऊ नये, हादेखील त्यामागील हेतू आहे.
>> अंघोळ केल्याशिवाय जेवू नये. अन्यथा अन्न सेवन करून प्रज्वलित झालेला जठराग्नी मंद होतो आणि पचनात बिघाड होऊन पचन क्रिया मंदावते. म्हणून अंघोळ झाल्यावरच अन्न सेवन करावे.
>> अन्नाला नावे ठेवू नये. अन्नाचा अपमान हा परमेश्वराचा, शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि अन्न रांधून वाढणाऱ्या गृहिणीचा अपमान असतो. म्हणून अन्नाला नावे ठेवू नये आणि पदार्थ नावडते असतील तरी नाक मुरडू नये. कारण, आजही जगात अनेक असे लोक आहेत, ज्यांना आवडते पदार्थ दूरच, पण दोन वेळच्या जेवणाचीही सोय नसते. ही बाब लक्षात ठेवून मुकाट्याने जेवावे.
>> जेवताना बोलू नये. आपल्या तोंडातले अन्न कण दुसऱ्याच्या ताटात पडतात किंवा तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे बघणाऱ्याला ते फार ओंगळवाणे वाटते. म्हणून जेवताना बोलू नये. प्रत्येक पदार्थाचा, चवीचा, रसांचा आस्वाद घेत जेवावे.
>> जेवायला बसताना अन्न मिळाले म्हणून आणि जेवून उठतात आजची पोटाची सोय झाली म्हणून ईश्वराचे आभार मानत ताटाला नमस्कार करावा.
>> पंगतीत किंवा चार चौघांबरोबर जेवायला बसताना आपले जेवून झाल्यावर उठून जाऊ नये, हा शिष्टाचार आहे. दुसऱ्यांचे होईपर्यंत थांबावे. म्हणजे त्यांना ओलांडून जाण्याची वेळ येत नाही आणि त्यांचा अपमानही होत नाही.
>> जेवताना तुटलेली ताटे, वाट्या, भांडी, पेले वापरू नयेत. ते दारिद्रयाचे लक्षण मानले जाते.
>> जेवताना पाटावर बसावे. कारण भोजनाला यज्ञ म्हटले जाते. 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म', म्हणजेच यज्ञात आहुती टाकताना जसे आसन घेऊन किंवा पाट मांडून बसतो, तसे अन्न ग्रहण करताना तो यज्ञकर्म आहे समजून पाटावर जेवायला बसावे.
>> केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर भोजन केले असता, त्यातील आयुर्वेदिक घटक शरीराला लाभदायक ठरतात. पाण्याचा अपव्यय टळतो आणि उष्टी, खरकटी पाने गायीगुरांना दिल्यास त्यांचेही पोट भरते.
>> ताटात काहीही टाकू नये. जे पदार्थ आपल्याला आवडत नाहीत किंवा जे पदार्थ आपल्याकडून संपणार नाहीत असे वाटते, ते पदार्थ उष्टे करण्याआधी दुसऱ्या ताटात काढून ठेवावेत. म्हणजे ते वाया जात नाही. उष्टे अन्न फेकून देण्यासारखे पाप नाही. म्हणून जेवायला वाढून घेताना जेवढे संपेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे आणि वाढलेले अन्न पूर्ण संपवावे.