स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या सर्वांना मुखोद्गत आहे. परंतु तो केवळ म्हणून भागणार नाही, तो समजून म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता सर्व स्तोत्रांचे सार काव्याच्या शेवटी असते. परंतु, स्वामींच्या तारक मंत्रात सुरवातीलाच स्तोत्राचे सार वाचता येते. तेही अवघ्या दोन शब्दांत!
ते दोन शब्द कोणते? तर... नि:शंक हो... निर्भय हो मना रे...!
अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते.
प्रश्न असा, की हा विश्वास आपण देवावर दाखवतो का? माझा देवावर विश्वास आहे, हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात विश्वास दाखवणं वेगळं.
एकदा स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या पत्नीबरोबर नावेतून प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना नाव नदीच्या मध्यापर्यंत पोहोचली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, मी तुला या नदीत ढकलून दिले, तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही.
हे ऐकून शारदा माता हसल्या.
रामकृष्ण म्हणाले, तुला जीवे मारण्याची मी धमकी देतोय आणि तू हसतेय?
यावर शारदा माता म्हणाल्या, तुम्ही तसे करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर मला तुमच्या वागणुकीबद्दल शंका वाटत नाही, तर भीती कुठून वाटणार?
याला म्हणतात अतूट विश्वास. असा विश्वास नात्यांमध्ये आणि भक्त भगवंतामध्ये निर्माण झाला, की आपोआप प्रचिती येते... प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!