आपण असंख्य अडचणींमुळे ग्रासलेले असतो, तेव्हा देवावर रोष ठेवतो. मात्र, ज्याअर्थी तुमच्या मार्गात अडथळे येत आहेत, त्याअर्थी तुम्ही भगवंताच्या विशेष कृपेस पात्र आहात, असे रामदासी कीर्तनकार ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनातून सोदाहरण पटवून दिले.
ते सांगतात, 'सामान्य कृपा प्रत्येकावरच होते. जसे की अनेकांच्या वाट्याला प्रापंचिक सुख किंवा ऐहिक सुख येते. त्यांना पाहून आपल्या मनात असूया उत्पन्न होते. त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यावी, की देवाला आपल्याला सामान्य सुखात अडकवून ठेवायचे नसून आपल्याकडून काही विधायक काम करवून घ्यायचे आहे. या विधानाला जोड देत त्यांनी सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले.
रमाकांत आचरेकर सर यांच्याकडे क्रिकेटची तालीम सुरू असताना सगळे विद्यार्थी वेळेत निघून जायचे, मात्र आचरेकर सर सचिनला उशिरापर्यंत सरावासाठी थांबवून घ्यायचे. त्यावेळी सचिनला सरांचा राग येई, पण नाईलाजाने सराव करत राहावा लागे. मात्र सरांनी त्यावेळी दिलेल्या त्रासाची किंमत शंभरावे शतक पूर्ण केले त्यावेळेस कळली. जे सचिनच्या बाबतीत घडले ते आपल्या बाबतीतही घडावे असे वाटत असेल तर परमेश्वररुपी गुरुवर श्रद्धा ठेवा, आपले काम प्रामाणिकपणे करत राहा, जेणेकरून तुम्हीदेखील विशेष कृपेस पात्र व्हाल. आणि तसे होणे हीच देवाचीही इच्छा असते!
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्याकडून अंबरनाथ पूर्व येथील केळकर सभागृहात रामदास स्वामींच्या पादुका आल्या आहेत. त्यानिमित्ताने १२ ते २० डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ ते ८ मकरंद बुवांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. 'बंधविमोचन राम' हे संत वेणास्वामींचे पूर्वपद घेऊन मकरंद बुवांनी पौराणिक, व्यावहारिक, वास्तविक दृष्टांत देत कीर्तनाचा श्रीगणेशा केला आहे. तसेच पहाटे काकड आरती, पादुकांची महापूजा, भिक्षा फेरी, भजन, करुणाष्टके, सवाया, आरती, कीर्तन आणि शेजारती असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहे.
यानिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी यावे आणि यथाशक्ती अन्न, धान्य किंवा आर्थिक रूपात सेवा मंडळाला दान करावे असे आवाहन मकरंद बुवांनी केले आहे. संपर्क : ९८८१६७८६७८