एक राजा असतो. त्याच्या राज्यात त्याची प्रजा सुखी समाधानी असते.सगळा राज्यकारभार सुरळीत सुरु असतो. फक्त राज्याला उत्तराधिकारी नाही, याचे शल्य सर्वांच्या मनात असते. राजा अनेक ज्योतिष्यांना विचारतो, अनेक वैद्यांचे उपचार घेतो, पण गुण येत नाही.
कर्मधर्मसंयोगाने एक दिवस त्याच्यावर देवाची कृपादृष्टी होते आणि गोड बातमी येणार असल्याचे कळते. नऊ महिन्यांचा काळ राजाला फार मोठा वाटू लागतो. सगळे प्रजाजन राजाकडे बाळ येणार या आनंदात असतात आणि तो शुभ दिवस उगवतो. राजपुत्र झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर प्रसरते. राजा एवढा आनंदून जातो, की आनंदाच्या भरात तो जाहीर करतो, 'उद्या सकाळी प्रजेने राजमहालात येऊन त्यांना हवी ती वस्तू घेऊन जावी. जो ज्या वस्तूला स्पर्श करेल, ती त्याची! लोकांना गंमत वाटते. सगळे जण काय आणता येईल हा विचार करतात.
ही बातमी एका छोट्या मुलाच्या कानावर येते. तोसुद्धा तिथे जाण्याचा हट्ट करतो. आई बाबा सांगतात, 'उद्या एवढी गर्दी लोटेल की तू चिरडून जाशील. म्हणून हट्ट करू नकोस. पण मुलाने हट्ट लावून धरला आणि त्याच्या आई बाबांना तो पुरवावा लागला. मात्र मुलाने आपल्याला काय हवे ते सांगितलेच नाही.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत राजमहाल सर्वांसाठी खुला करून दिला, तशी लोकांची झुंबड उडाली. लोक आनंदाने येत होते, हवं ते घेऊन जात होते. राजाची अक्षय्य संपत्ती असल्याने सर्वांना पुरून उरेल एवढे धन धान्य होते.
आदल्या दिवशी हट्ट करणारा मुलगा दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खांद्यावर बसून त्या गर्दीत सामील झाला. त्याने वडिलांना सांगून खाली उतरायला लावले आणि तो धावत गेला व राजाला स्पर्श करत म्हणाला, 'आजपासून राजा माझा आणि राजाची प्रजाही माझी!"
तात्पर्य हेच, की देव आपल्यासाठी जे हवे ते मागायला त्याचा दरबार खुला करून देतो, परंतु प्रश्न असा आहे, की आपल्याला दरबारातल्या किरकोळ वस्तू हव्या आहेत की या दरबाराचा मालक हवा आहे? म्हणून देवाकडे काही मागण्याऐवजी देवालाच मागून घ्या. म्हणजे इतर कसलीही उणीव भासणार नाही.