'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' अशा शब्दात समर्थ रामदास स्वामी आपली कानउघडणी करतात. परंतु आपण सुधारत नाही. आपल्याला छोट्या छोट्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली असते. ही सवय एक दिवस आपला घात करते. कशी ते पहा...
एका शेतकऱ्याला मुलगा होता. शेतकऱ्याला वाटत होते, भविष्यात मुलाने आपले काम सांभाळावे. परंतु मुलाला राजाच्या सैन्यात भरती व्हायचे होते. शेतकऱ्याने त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा दिली. मुलाला सैन्यात भरती व्हायचे असले, तरी त्यासाठी लागणारे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. ना कमावलेले शरीर ना शस्त्र विद्येत प्राविण्य. त्याचा मामा सैन्यात सेनापती होता. मुलाने आपल्या आईला सांगून मामाकडे शब्द टाकायला लावला. भाच्याला नकार कसा द्यायचा, म्हणून मामाने त्याला सैन्यात भरती करून घेतले, पण जिथे विशेष कामे नसतात, अशा विभागात त्याची नियुक्ती केली.
मुलगा इतर सैनिकांसारखा ताठ मानेने गावात फिरू लागला. एकदा परराज्यातून हल्ला झाला आणि सैन्य विभागाच्या तळा गाळातील सैनिकांनासुद्धा युद्धभूमीवर लढण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस या मुलालाही नाईलाजाने जावे लागले. परंतु, त्याला युद्धाचे जराही ज्ञान नसल्याने इतर सैनिक त्याचे संरक्षण करत त्याला परत घेऊन आले. त्यांनी सेनापतीजवळ त्याची तक्रार केली. मामा असूनही सेनापतींचा नाईलाज झाला. त्यांनी भाच्याला राजाच्या दरबाराबाहेरचा पहारेकरी म्हणून नोकरी लावून दिली.
दिवसरात्र उभे राहून, पहारा देऊन आधीच कमकुवत असलेला मुलगा प्रकृतीने आणखी ढासळू लागला. त्याला मामाचीसुद्धा साथ मिळणार नव्हती. तो राजाकडे काही वशिला लागेल या आशेने उभा असे. थंडीच्या दिवसात हुडहुडत पहारा देत असताना एक दिवस राजाचे लक्ष त्याच्याकडे गेले. राजाने त्याची चौकशी केली आणि सेवकांकरवी त्याच्यासाठी उबदार शाल पाठवतो, असे राजाने आश्वासन दिले. मुलाला हायसे वाटले. राजाने आपली दखल घेतली याचा त्याला आनंद झाला. परंतु बराच काळ वाट बघूनही आतून शाल आली नाही. कारण राजा महालात गेल्यावर ही छोटीशी गोष्ट विसरून गेला. परंतु, बाहेर उभ्या असलेल्या मुलाने शालीसाठी तिष्ठत प्राण सोडले.
या कथेवरून लक्षात येते, की कोणी आपल्या मदतीला धावून येईल, याची वाट बघत बसलात तर आहे तेही गमावून बसाल. म्हणून स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!