आईस्क्रीमला संस्कृतात एक छान शब्द आहे, 'दुग्धशर्करायुक्तहिमघनगोलगट्टू' आईस्क्रीमसारखाच हा शब्दही गोड आहे, नाही का? पुढच्या वेळेस आईस्क्रीम खाणार का ऐवजी हा शब्दप्रयोग आवर्जून करा. तुम्हाला आणि ऐकण्याऱ्याला मजा येईल. आहे ना मजेशीर? आईस्क्रीम आपल्या सर्वांना आवडते. परंतु, ते खाताना आपली जी मानसिकता असते, ती आपली भोगी आणि विलासी वृत्ती दर्शवते. आईस्क्रीम वितळण्याआधी खाऊन टाका, त्याचा आनंद घ्या. वास्तविक पाहता, यात चुकीचे असे काहीच नाही. परंतु यात केवळ मी आणि माझा एवढाच विचार दिसून येता़े असा विचार करणाऱ्यांना केवळ तात्पुरते समाधान मिळू शकते. परंतु ज्यांना चिरंतन आनंद, समाधान हवे आहे, त्यांनी मेणबत्तीचा आदर्श बाळगायला हवा.
आईस्क्रीम आणि मेणबत्ती यात एक साम्य आहे. ते म्हणजे दोन्ही वितळतात. परंतु, आईस्क्रीमचा आनंद एकाला मिळतो, तर मेणबत्ती वितळताना, जळताना दुसऱ्यांना प्रकाशमान करून जाते. आनंद आईस्क्रीमचा घेतला, तरी आदर्श कायम मेणबत्तीचा ठेवायला हवा.
दुसऱ्यांना देण्यात, मदत करण्यात, उपयोगी पडण्यात जे समाधान आहे, ते स्वत:पुरते जगण्यात कधीही अनुभवता येणार नाही. आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद तुम्ही जगातली महागडी वस्तू विकत घेऊनसुद्धा मिळेल, याची शाश्वती नाही. कारण, भौतिक सुख हे क्षणभंगूर असते. जसे की महागडी गाडी विकत घेतली, परंतु त्यावर साधा ओरखडा पडला, अपघात झाला, बिघाड झाला, की आनंदावर विरजण पडते. याउलट दुसऱ्याला केलेली छोटीशी मदत त्याने लक्षात ठेवो न ठेवो, तुम्हाला सत्कर्म केल्याचा आनंद आयुष्यभर देते.
म्हणून आईस्क्रीम आणि मेणबत्ती या दोन्ही गोष्टी वितळणाऱ्या असल्या, तरी एकाचे वितळणे स्वार्थासाठी तर दुसऱ्याचे वितळणे परमार्थासाठी आहे, हे लक्षात घ्या.आयुष्यात योगी बनायचे असेल, तर आधी उपयोगी बनायला शिका, कारण त्यातच अत्युच्च समाधान दडले आहे.
-इति गौर गोपालदास प्रभू (जगविख्यात धार्मिक व्याख्याते)