अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व. या आठ सिद्धी आहेत. त्यांना पारलौकिक शक्ती असेही संबोधले जाते. त्या प्राप्त झाल्या असता साधक कोणतेही चमत्कार करू शकतो आणि त्यांचा स्वैरपणे वापर करू शकतो.या सिद्धी हनुमंताला जन्मतः अवगत होत्या, परंतु त्यांना या शक्तींचा विसर पडला होता. मात्र रामकार्याच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीचा आठव करून दिला आणि पुढे श्रीराम आणि सीता माईच्या कृपेने त्या सिद्धी आणखी प्रबळ झाल्या.
हनुमंताने जन्माला येताच भूक लागली म्हणून सूर्याला सफरचंद म्हणून ग्रासले होते. त्यावेळी राहू केतूने हनुमंताशी दोन हात केले. परंतु हनुमंत त्यांना पुरून उरतोय हे बघून इंद्राने त्याच्या हनुवटीवर वज्र प्रहार केला. बाल हनुमान मूर्च्छित होऊन पडला. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी अर्थात पवन देवांनी आपले कार्य थांबवले. सगळ्या जीव सृष्टीचे श्वासोच्छ्वास थांबले. तेव्हा सर्व देव पवन देवाला शरण आले. पवन देवांनी सर्व देवांना सांगून हनुमंताला शुद्धीवर आणायला सांगितले. त्यावेळेस इंद्र देवाने आदिशक्तीची उपासना करून हनुमंताला शुद्धीवर तर आणलेच शिवाय त्याला कठोर वज्रासमान बलदंड शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. त्यापाठोपाठ इतर देवांनीही हनुमंताला सिद्धी दिल्या. त्यामुळे बालपणीच हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. मात्र त्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी इंद्र देवांनी हनुमानाला वरदान दिले की ज्यावेळेस या सिध्दीची खरी आवश्यकता लागेल तेव्हा त्या सिद्धी कार्यन्वित होतील आणि राम कृपेने त्या सिद्धीला तेज प्राप्त होईल.
त्यानुसार रामसेतू बांधताना किंवा लंकेत सीतेपर्यंत श्रीरामाचा निरोप देण्यासाठी अणू सारखे सूक्ष्म रूप धारण करण्यासाठी जांबुवंताने हनुमानाला त्याच्या ठायी असलेल्या शक्तींची आठवण करून दिली. त्यायोगे त्याचे सामर्थ्य वाढले आणि त्याने कधी सूक्ष्म तर कधी बलाढ्य रूप धारण करून रामकार्यासाठी सिद्धी वापरली.
या सर्व सिद्धी आपल्या ठायी देखील असतात. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी त्या स्थित असतात. त्या कार्यन्वित होण्यासाठी राम नामाची उपासना हवी. ध्यान धारणेने स्व सामर्थ्याचे भान येते. चांगल्या कार्यासाठी या अष्टसिद्धीचा वापर केला असता ईश्वरी शक्तीचेही पाठबळ मिळते. त्यासाठी सच्चा भाव आणि ईश्वरावर नितांत श्रद्धा हवी. तसेच स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर आपणही चमत्कार नक्कीच घडवू शकतो!
जय श्रीराम! बजरंग बली की जय!