तग धरण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाचे पटकन अवसान गळते, तर कोणी स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहते. याबाबत एका शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला, तो सिद्धांत होता `संयमाचा सिद्धांत' त्याबाबत एक गोष्ट आहे ती अशी-
एका शास्त्रज्ञाने प्रयोग म्हणून एका उंदराची क्षमता पाहायची असे ठरवले. त्याने एका पाणी पिण्याच्या खोलगट भांड्यात एका उंदराला टाकले आणि काही वेळात त्याची धडपड पाहून त्याला बाहेर काढले.
दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा एकदा तो प्रयोग केला. मात्र यावेळेस त्या भांड्यात पाणी टाकले आणि नंतर उंदराला आत सोडले. कालच्यासारखाच बाहेर पडण्यासाठी उंदीर प्रयत्न करू लागला. परंतु शास्त्रज्ञाला आज त्याच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती. म्हणून यावेळेस त्याने मदतीचा हात पुढे केला नाही. परंतु आश्चर्य म्हणजे पाणी भरलेल्या त्या भांड्यात पोहता येत नसतानाही उंदराने बाहेर पडण्याची खटाटोप सुरू ठेवली.
त्याची धडपड अतिशय केविलवाणी होती. परंतु अशा प्रसंगी भावुक होऊन चालणार नव्हते. म्हणून शास्त्रज्ञाने आणखी काही काळ त्याची परीक्षा पाहिली. तर काय आश्चर्य...पुढचा दीड दिवस त्या उंदराने अथकपणे हात पाय मारत बाहेर पडण्याची जिद्द कायम ठेवली. शेवटी शास्त्रज्ञाने त्याचा आणखी अंत न पाहता त्याला सुरक्षित पणे बाहेर काढून उबदार जागेत ठेवले आणि उंदराचे प्राण वाचवले. या सिद्धांताला त्याने `संयमाचा सिद्धांत' असे नाव दिले.
तुम्ही म्हणाल, यात कुठला आलाय सिद्धांत? उंदराने तग धरली, याला सिद्धांत म्हणावे का? तर नाही, सिद्धांत हा आहे, की उंदराने तोपर्यंत जगण्याची जिद्द कायम ठेवली, जोपर्यंत त्याला आदल्या दिवशीसारखा मदतीचा हात मिळाला नाही. तो हात मिळेपर्यंत एवढ्याशा जिवाने मृत्यूशी झुंज दिली, संयमाचा कस लावला आणि तग धरून ठेवण्यात यशस्वी झाला, त्यालाच शास्त्रज्ञाने संयमाचा सिद्धांत असे नाव दिले.
आयुष्यात आपल्यावरही अशी जिवन-मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला मदतीचा हात येईपर्यंत तग धरून ठेवण्याची तयारी दाखवायला हवी. तो हात एक ना एक दिवस मदतीला नक्की येईल, आपण तोवर संयम दाखवायला हवा!