शीर्षक वाचून असंख्य मांजर प्रेमी गोंधळले असतील. मोक्षही हवा आणि मांजरही अशी त्यांची द्विधा मनःस्थिती झाली असेल. कोणाही एकाला निवडायचे तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणार, या विचाराने नाराज होऊ नका. ओशो सांगताहेत या वचनामागील तर्कवाद, तेही एका गोष्टीच्या स्वरूपात...
एक साधू होते. त्यांच्याकडे शंका निरसन करण्यासाठी अनेक लोक येत असत. त्यातल्याच एकाने दुःखाचे कारण विचारले. त्यावर साधू म्हणाले, 'तुझ्या घरातली मांजर हे तुझ्या दुःखाचे मूळ आहे. तिला सोडून दे!' व्यक्ती गोंधळली. ती म्हणाली, 'पण महाराज, तिची बिचारीची काहीच चूक नाही की तिचा काहीच त्रासही नाही. पण तुम्ही तिलाच सोडून द्यायला सांगत आहात.
साधू म्हणाले, 'माझ्या गुरुंनी मला सांगितले ते मी तुला सांगितले. मी माझ्या गुरुंना तसे सांगण्यामागचे कारण विचारले नाही, मात्र आता तू विचारलेच आहेस तर सांगतो. मी साधू संन्यासी! एकटा जीव सदाशिव! तरी रोजच्या उदर भरणासाठी मला गावात जाऊन माधुकरी मागावी लागे. मी तसे करायचो. घरी आलो की थोडं धान्य वापरून उरलेलं धान्य सायंकाळ साठी ठेवून द्यायचो. धान्य साठा होऊ लागल्याने माझ्या झोपडीत उंदीर आले. धान्य संपले म्हणून ते माझी लंगोट कुरतडू लागले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी मला एक मांजर दिले.
मांजर उंदीर खाऊन झाल्यावरही भुकेपोटी गुरकावुन बघू लागले. मांजरीला दूध लागणार म्हणून गावकऱ्यांनी एक गाय भेट दिली. म्हणाले, 'मांजरीला दूध द्या आणि तुम्हीसुद्धा गायीचे दूध पिऊन धष्ट पुष्ट व्हा!' म्हणून मी गाय पाळली. पण आता गायीलाही वेळच्या वेळी चारा पाणी देण्याची सोय करावी लागली. मग गावकरी म्हणाले, तुम्हाला एक सेविका देतो ती घराची स्वच्छता करेल आणि पाळीव प्राण्याची देखभाल करून तुम्हाला जेवूसुद्धा घालेल. सेविका तिथे राहू लागली. ती हळू हळू आमच्या संसाराची स्वप्नं पाहू लागली. पण मी बैरागी. तिला सन्मानपूर्वक निरोप देण्याआधी मी पहिले काम काही केले असेल, तर ते म्हणजे मांजर सोडून दिले. त्या पाठोपाठ असलेले व्याप संपले आणि माझी सुटका अर्थात मला भवतापातून मोक्ष मिळाला.
तात्पर्य हेच, की आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींना ओशो मांजर संबोधतात. दुःखाचे मूळ नष्ट करा अर्थात मोहाच्या गोष्टी बाजूला सारा तर आणि तरच तुमची प्रगती होऊ शकेल असे ओशो सुचवतात.