मनुष्य जन्माला येतो, वाढतो, जगतो आणि एक दिवस मरतो. या कालावधीत तो काय करतो यावर त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास ठरतो. किडा मुंगीदेखील जगतात, परंतु मनुष्य जन्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे कारण परमेश्वराने मनुष्याला देह, बुद्धी, विचारशील मन आणि कृती करायला हात, पाय असे सर्व काही दिले आहे. त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात. दर वाढदिवसाला आपल्या गत आयुष्याचे सिंहावलोकन करून पुढील आयुष्यात मागे झालेल्या चुका टाळणे ही आपल्यासाठी संधी असते. त्यासाठी शास्त्रकारांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे-
>>ज्या लोकांमध्ये दयाभाव नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वभावाचा हा कठोरपणा त्यांना माणूस म्हणवून घेण्याचा हक्क देत नाही निष्ठुरपणाने जगणाऱ्या लोकांचे जीवनात मोठे नुकसान होते.
>>जे लोक नेहमी दुसऱ्यांशी भांडत असतात आणि शत्रू बनवतात. अशा लोकांपासून इतर लोक अंतर ठेवतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही. माणसाची ही वाईट वागणूक ना त्याला यश मिळवू देत ना आनंद! अशी व्यक्ती आपल्या कुटुंबाची हानी आणि बदनामी करून घेतात.
>>जे लोक स्वतः कर्म करून पैसा कमावण्याऐवजी इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. उलट चोरी, लबाडी आणि फसवणूक करून कमावलेला पैसा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नाश करतो.
>>जे लोक आपल्या मित्रपरिवाराला अडचणीच्या वेळी मदत करत नाहीत, लोक त्यांना साथही देत नाहीत. अडचणीच्या वेळी या लोकांना कोणीही मदत करत नाही. ते त्यांच्या आयुष्यात एकाकी पडतात.
>>जी व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगते अशा व्यक्तीलाही स्वर्गात जागा मिळत नाही. याउलट जे लोक इतरांना सहकार्य, सेवा, मदत करतात त्यांना नरकाची भीती नसते.
>>सतत रागावणाऱ्या लोकांच्या आयुष्यात शेवटी पश्चातापच भोगण्याची वेळ येते. रागामुळे त्याच्या स्वतःच्या घरातील लोकांनाही त्याच्यासोबत राहणे आवडत नाही. रागामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या संधी गमावतात आणि त्यांची ऊर्जा नकारात्मक कामात वाया घालवतात. असे लोक मेले तरी समाजाला काही फरक पडत नाही. आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास दिल्याची शिक्षा म्हणून जिवंतपणी आणि मृत्यूपश्चातही नरक भोगावा लागतो!