कधीही कोणतीही व्याधी उद्भवली की प्राथमिक उपचार म्हणून कामी येतो, तो म्हणजे आजीचा बटवा. त्यात असते काय? तर प्राचीन काळापासून अभ्यास, संशोधनातून सिद्ध झालेली जडीबुटी, अर्थात आयुर्वेदिक औषधं! गेल्या वर्षभरात कोरोनाशी दोन हात करतानाही तिच कामी आली. कोमट पाणी, वाफारे, धुपारे, तुळशी काढा, मिठाच्या गुळण्या ई औषधांनी दिलासा दिला. परंतु कोरोनावर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदाने सरशी का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. व्याधींच्या मुळाशी लढणे, हा आयुर्वेदाचा गुण आहे. असे असतानाही अजूनपर्यंत आयुर्वेदाला म्हणावी तेवढी प्रसिद्धी का प्राप्त झाली नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांवर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेत्री खुशबू तावडे त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
या संवादाच्या निमित्ताने आपणही आयुर्वेदाचा सविस्तर परिचय करून घेऊया. या चर्चासत्रात आपणही सहभागी व्हा. विषय : आयुर्वेदाचा लढा कुठंपर्यंत?दि. २३ जानेवारी २०२१, दुपारी ३ वाजता