भगवद्गीतेत ज्ञानयोग वा संन्यासयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तिन्हीही सांगितले आहेत; परंतु कर्मयोगाला विशेष महत्त्व दिले आहे. याला आधार म्हणून सांगितलेला युक्तिवाद असा : जिवंत देहाचा कर्म हा स्वभाव आहे. श्वासोच्छ्वास, नेत्रांची उघडझाप, आहारविहार इ. कर्मे कोणत्याही देहधार्याला टळत नाहीत. देहधारणार्थ विविध कर्मे करावीच लागतात. दुसरे असे, की स्थूल देह, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व मन हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे विकार असल्यामुळे प्रवृत्ती व निवृत्तिरूप कर्म हा त्यांचा स्वभाव आहे. ज्याचा जो स्वभाव आहे. त्या स्वभावाला धरून विहित कर्म कोणते व निषिद्ध कर्म कोणते हे ठरविता येते. शास्त्राप्रमाणे किंवा विवेकबुद्धीप्रमाणे आपले स्वभावनियत कर्म कोणते, हे निश्चित करता येते. तोच स्वधर्म होय. स्वधर्माचरणाने इहलोकीची यात्रा नीट चालून पारलौकिक कल्याण साधता येते. या स्वभावनियत स्वधर्मालाच ‘यज्ञ’ असे म्हणतात. तिसरे असे, की ईश्वरानुग्रह प्राप्त होऊन पापातून मुक्त व्हावे, ईश्वरसाक्षात्कार व्हावा आणि परमशांती मिळावी असे ज्याला वाटते, त्याने निष्काम बुद्धीने, फलाशारहित वर सांगितलेल्या द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने, ईश्वरास सर्वथा शरण जाऊन कर्मे करावी; म्हणजे चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती व मोक्षसिद्धी होते. निष्काम बुद्धीने व ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्मे बंधनकारक होत नाहीत. निष्काम बुद्धी म्हणजे अनासक्ती. अनासक्ती हाच खरा संन्यास होय. प्रत्यक्ष कर्मे सोडणे हा संन्सास नव्हे. कारण कर्मे सोडताच येत नाहीत. ईश्वरार्पण बुद्धी हीच भक्ती होय. अशा रीतीने कर्माशी म्हणजे स्वधर्माशी भक्ती, संन्यास आणि ज्ञान यांचा सांधा जुळतो. यालाच गीतारहस्यकार लोकमान्य टिळक ‘ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग’ म्हणतात. येथे ज्ञान हे दोन प्रकारचे : (१) परोक्ष व (२) अपरोक्ष म्हणजे साक्षात्कारात्मक. मुमुक्षू स्थितीत श्रवण, मनन व निदिध्यासन ह्या तीन अवस्थांतील ज्ञान हे परोक्ष ज्ञान होय. अशा प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती होऊन ते दृढ होईपर्यंत जी स्थिती असते, ती मुमुक्षूची अवस्था होय. ह्या मुमुक्षू स्थितीत ईश्वराराधनारूप भक्ती चालूच ठेवावी लागते. ज्ञान जेव्हा साक्षात्काराच्या अवस्थेत पोहोचते, तेव्हा त्या अवस्थेत व्यक्ती मुक्त होते.गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र –कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥(माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्यात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको) या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे, तात्पर्य फलाची, कर्माची व अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अमलात आणणे हेच कर्मयोगाचे मोक्षदृष्ट्या सार आहे. फलाची, कर्माची व अकर्माची आसक्ती नसेल, तर कर्म होईलही व होणारही नाही. देहधारणेची कर्मे होत राहतील; परंतु तीसुद्धा कदाचित होणारही नाहीत. अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो. हा प्रश्न अवघड आहे. त्याचे उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केला आहे. ते देताना सात्त्विक कर्त्याचे लक्षण सांगितले आहे. सात्त्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी. ते लक्षण असे :मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।सिध्यसिध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उध्यते ॥(आसक्तीरहित, अनहंकारी, धैर्य व उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी व असिद्धी यांपैकी काहीही झाले, तरी ज्याच्या मनात अनुकूल वा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही, तो सात्त्विक कर्ता होय). धृती (चिकाटी) व उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभावसिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचे अपरिहार्य असे कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले, तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्तस्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रगट होत राहतात. चित्तशुद्धीकरिता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे संस्काराच्या योगाने धृती व उत्साह अधिक कार्यप्रवण होतात.
-श्री. ज्ञानेश्वर माऊली खंडागळे