आपल्या अवती भोवती एवढे आवाज असतात की बाजूला बसलेला माणूस काय बोलतो हे ऐकू येत नाही तर आतला आवाज कुठून ऐकू येणार? परंतु याच गदारोळामुळे आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो. प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधत राहतो. पण मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी सांगतो, तुम्हाला हवी असलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुमच्याच जवळ आहेत, पण ती ऐकण्यासाठी तुमचे कान सावध नाहीत. त्यासाठी सात दिवस दिलेला सराव करा, तुम्हाला तुमचा शोध लागेल.
आपल्या सगळ्यांना वाईट सवय किंवा खोड असते, ती म्हणजे रिकामे वाटू लागले की वेळ काढण्यासाठी मोबाईल हातात घ्या नाहीतर टीव्ही बघा. अशा वेळी आपण बाहेर जाणे, निसर्गात फिरणे, लोकांशी बोलणे या गोष्टी करायच्या सोडून आपल्याच चौकटीत राहणे पसंत करतो. त्यामुळे एकलकोंडेपणा जास्त वाढतो. त्याऐवजी जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा शांत बसायला शिका. आपल्या डोक्यात काय सुरू आहे ते तटस्थपणे बघायला शिका. काहीही न करता शांत बसण्याची सवय नसल्याने सुरुवातीला ते अवघड वाटेल, शांत बसण्याचा कंटाळाही येईल, मात्र ते करत राहा. सरावाने तो कंटाळा निघून जाईल.
संदीप हे स्वानुभवाच्या आधारावर सांगताना म्हणतात, 'मी वर्षातून दोनदा तरी बाहेरगावी एकटा जातो व जाताना मोबाईल नेणे टाळतो. त्यामुळे मला माझ्या सान्निध्यात पूर्ण वेळ मिळतो. पूर्णवेळ स्वतःच्या सोबत राहणे कंटाळवाणे वाटले तरी तो अनुभव नावीन्य पूर्ण असतो. एका लिमिटनंतर तुमच्या डोक्यातले विषय संपून जातात आणि मनाच्या खोलवर रुतलेले विषय मान वर काढतात. त्यावर मनातल्या मनातही व्यक्त होणे टाळा. त्यामुळे तुमचे मन तुमच्याशी बोलू लागेल. तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे, तुमच्या मर्यादा किती व कोणत्या यांची जाणीव करून देईल. तुमची उत्तरे तुम्हाला अवश्य सापडतील.
या सरावासाठी सलग तीन दिवस, दहा दिवस मोबाईल किंवा अन्य संपर्क साधनांपासून दूर राहिले पाहिजे. तसे केले, तरच तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख होईल. बाहेरचे आवाज शांत झाले की आतला आवाज ऐकू येईल आणि तो कधीच चुकीचा मार्ग दाखवणार नाही. यासाठी खूप अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या मुद्द्याशी थांबणे, चिंतन करणे, स्वतःला वेळ देणे. म्हणतात ना, 'तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी'
ध्यानधारणा ही त्याची प्राथमिक पातळी आहे. रोज स्वतःसाठी दहा मिनिटे काढा. विचार मनात आले तरी येऊ द्या. शांत राहिल्याने तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होईल, जशी आपली संगणक व्यवस्था असते. तिच्यावर बटनं दाबून मारा केला तर ती आणखी कोलमंडते, याउलट वेळ दिला तर यंत्रणा शांत होते आणि आपोआप कार्यन्वित होते.
तीच शांतता मेंदूलाही आवश्यक असते. त्याला शांत होऊ द्या, तुम्हाला तुमचा आतला आवाज नक्की सापडेल!