ईश्वर शक्ती ही निर्गुण निराकार आहे. ती चराचरात व्यापून आहे. तसे असले तरीदेखील वेगवेगळ्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या अस्तित्त्वाची ती अनुभूती देत असते. ते रूप कोणतेही असू शकेल. त्याचे स्थिर मूर्तीमंत रूप सगुण भक्तीचे द्योतक मानले जाते, तर त्याच्या शक्तीची जाणीव ठेवणे आणि अनुभव घेणे ही निर्गुण भक्ती मानली जात़े या गोष्टी समजायला बोजड वाटत असतील तर रामायणात डोकावून पाहू.
वनवासाची शिक्षा मिळाल्यावर राम एकटे निघाले होते, परंतु लक्ष्मणाने एकीकडे आई वडिलांचा, नववधू होऊन घरी आलेल्या पत्नी उर्मिलेचा आणि इतर भावंडांचा विचार न करता रामाबरोबर जाण्याचा हट्ट केला. कारण त्याला रामसेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. यासाठी त्याने अविरत कष्ट भोगले. संसार सुखाचा त्याग केला. देहाचे विकार, वासना, लोभ या वृत्तींचा त्याग केला. आणि पूर्ण वेळ रामसेवा केली. ही लक्ष्मणाची सगुण भक्ती!
तर भरताने रामराज्यपदाचा त्याग करून रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यात राहून वनवासी जीवन पत्करले. चित्रकुट पर्वतावर रामाची झालेली अखेरची भेट, शेवटची छबी मनात ठेवून भरताने अप्रत्यक्षपणे रामसेवा केली, अयोध्येचा राज्यकारभार स्वीकारला आणि राम परत येताच राज्यपदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवून रामसेवेत रत झाला. चौदा वर्षे डोळ्यासमोर प्रत्यक्ष राम नसताना त्याने मनोमन केलेली सेवा ही निर्गुण भक्ती!
रामाने दोघांची भक्ती स्वीकार केली आणि दोन्ही भावांवर सारखेच प्रेम केले. याचाच अर्थ निर्गुण भक्ती प्रथम आणि सगुण भक्ती दुय्यम असे काहीच नाही. सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा प्रवासही आनंददायी असतो.
जसे की आपण भाद्रपदात बाप्पाला घरी बोलवतो, सेवा करतो, गोड धोड खाऊ घालून भरल्या अंत:करणाने निरोप देतो. तेव्हा मूर्तीचे विसर्जन करण्याआधी डोळे भरून पाहून घेतो, ही सगुण भक्ती आणि त्या दर्शनाचा आठव, स्मरण पुढील वर्षभर ठेवून पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून त्याची पूजा करतो, ती निर्गुण भक्ती.
भक्तीची दोन्ही रूपे देवाला प्रिय आहेत. पण ती नि:स्वार्थ असावी. देवाला प्रेमाने घातलेली साद त्याच्यापर्यंत पोहोचतेच. मग त्यासाठी तुम्ही सगुण भक्तीचे माध्यम वापरा नाहीतर निर्गुण भक्तीचे!