>>आदित्य राजन जोशी
गर्भाधान संस्कार पूर्ण झाल्यानंतर, गर्भात असलेल्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आणि निरोगी बालक जन्मण्यासाठी पुंसवन संस्कार करतात. हा संस्कार गर्भधारणेच्या दुसऱ्या किंवा काही प्रांतात तिसऱ्या महिन्यात केला जातो. याद्वारे गर्भवती महिलेला मंगलमय वातावरण प्राप्त होते तसेच गर्भाचा विकास होऊन त्याला शुभत्व मिळण्यासाठी उपयुक्त ठरते. सशक्त आणि निरोगी मुलाला जन्म देणे हा या संस्काराचा उद्देश आहे.
हिंदू धर्मात सोळा संस्कारांना खूप महत्त्व आहे. हे संस्कारच मानवी जीवनाच्या स्थितीला गती देतात. या संस्कारांनी जगाच्या निर्मितीत आणि मानव कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या आपल्या शरीराला या संस्कारांशी जोडून यशस्वी आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. बाळाचा गर्भाशयात विकास होण्याच्या प्रक्रियेपासून सोळा संस्काराची सुरवात होते . हा विधी गर्भाच्या मानसिक आणि बौद्धिक प्रगतीत खोल पाया घालण्याच काम करतो.
गर्भाधान संस्कार कशाला म्हणतात, त्याचे लाभ काय आणि महत्त्व काय? सविस्तर जाणून घ्या!
गर्भधारणेनंतर, गर्भाचे रक्षण करण्यासाठी विष्णूची पूजा केली जाते. ही पूजा श्रवण, रोहणी, पुष्य नक्षत्र यांपैकी कोणत्याही एका नक्षत्रात करता येते. या नक्षत्राव्यतिरिक्त गुरुवार, सोमवार, शुक्रवार इत्यादी शुभ दिवस सुद्धा असणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थिर लग्न , शुभ ग्रह केंद्रात असणे, मूल त्रिकोण योग कोणत्याही एका योगाची निवड केली जाते. गर्भिणीच्या पत्रिकेत पुंसवन संस्काराच्या वेळी अष्टम भावावर गोचारीने पापग्रहांची दृष्टी किंवा पाप ग्रह अष्टमात असू नये .
पुंसवन संस्कारासाठी लागणारी औषध निर्मिती खालीलप्रमाणे
हा विधी करण्यासाठी औषध सुद्धा बनवावं लागत . वटवृक्षाचा कोवळ्या पारंब्या, गुळवेल, पिंपळाची ताजी पाने बारीक करून अतिशय पातळ द्रावण तयार केले जाते. याशिवाय इतरही काही औषधे वापरली जातात ही औषधें वैद्याच्या सल्ल्याने तयार करून घ्यावी. पायस तयार करून योग्य ब्राह्मणाकडून यज्ञ करावा, तयार केलेले औषध गर्भवती महिलेला वैद्याच्या सल्ल्याने द्यावे. औषधाचे काही थेंब गर्भवती महिलेच्या नाकपुड्यात टाकले जातात. वेदमंत्रांच्या साहाय्याने हा विधी होण्याला महत्त्व आहे. नाकावाटे औषध घेतल्याने गर्भात वाढणाऱ्या बालकाला उत्तम आरोग्य बुद्धी आणि बल प्राप्त होते.
(वरील फोटोत वेद शास्त्र संपन्न गुरजी पुंसवन संस्कार विधी करत आहेत ब्राम्हणांच्या वैदिक मंत्रोच्चारात यजमान त्यांच्या गर्भिणीपत्नीच्या उजव्या नाकपुडीत औषधी घालत आहेत. )
पुढील योग असल्यास पुंसवन संस्कार करू नयेत
व्याघात योग , परिध योग, वज्र योग, व्यतिपात योग, वैधृती योग, गंड योग, अतिगंड योग, शूल योग, विष्कुंभ योग हे ९ योग पुंसवन संस्कार, कर्णवेध, व्रतबंध आणि विवाहासाठी सुद्धा निषिद्ध आहेत. या योगांच्या नावांप्रमाणेच त्यांच्यापासून मिळणारी फळेही तशीच आहेत.
पुंसावन संस्कार का करतात?
हा विधी गर्भाचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या प्रभावाखाली आहे हे सुनिश्चित करण्यात मदत करतो. गर्भधारणेच्या दुस-या किंवा तिसर्या महिन्यात पुंसवन संस्कार करावा असे सांगितले आहे. पुंसवन कर्मामुळे गर्भातील मुलीचे किंवा मुलाचे लिंग ठरते अशी मान्यता आहे. गर्भात लिंगभेद दिसण्यापूर्वी पुंसवन विधी केला पाहिजे. सामान्यत लिंग गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यात स्पष्ट होतात. म्हणूनच पुंसवन कर्म नेहमी दुसऱ्या महिन्यातच केले पाहिजे कारण तिसऱ्या महिन्यापासून गर्भातील अवयवांची निर्मिती सुरू होते. बाळाच्या अवयवांचा विकास आणि मानसिक विकास तिसऱ्या महिन्यापासून सुरू होतो, म्हणून हा विधी याच काळात केला जातो.
मूल जन्माला येण्याआधीच्या प्रक्रियेचा धर्मशास्त्राने किती सखोल अभ्यास केला आहे पहा!
गर्भाचा उत्तम विकास हा कुटुंबासाठी चागला असतो. मुलाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाबरोबरच, आईच्या आनंदी गर्भधारणेसाठी हा विधी करणे चांगले समजले जाते. आजच्या काळात आपण सर्वजण या महत्त्वाच्या विधी पासून दूर जात आहोत ही चिंतेची बाब आहे . ह्या मुळेच आताच्या पिढी मध्ये मानसिक तणाव आत्महत्या, दुर्बळ मन , सहनशक्ती चा अंत अशे गुण वाढू लागले आहेत. पूर्वी सर्व कृतींमागे काही ना काही महत्त्वाचे तर्क जुळवले जायचे आणि त्यातून आपल्या आयुष्यालाही आधार मिळालाचा. आजच्या काळातही या सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि त्यानुसार आचरण केले तर जीवनात सहज प्रगती करता येईल...