भारतीय लग्नसंस्था पूर्वीसारखी राहिली नसून त्यात अनेक स्थित्यंतर झाली आहेत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सोहळा, आप्त नातलग, मित्र मंडळी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेली लग्न गाठ आणि आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याचं दिलेलं वचन! मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. करिअर घडवत असताना लग्नाचं वाढलेलं वय, स्वभावात आलेली अढी आणि अपेक्षांचे डोंगर यामुळे लग्न ठरणं, होणं आणि टिकणं हे आव्हान झाले आहे.
लग्न का ठरत नाही विचारावं, तर मुलाकडचे मुलींना आणि मुलीकडचे मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी मुलाकडचे होकार, नकार कळवण्यासाठी तंगवून ठेवायचे, आता मुलीकडचे उत्तर देण्यात दिरंगाई करतात. पर्यायी दोघांची वयं वाढतात आणि पालकांचे अपेक्षा भंग होतात. यावर उपाय म्हणून अध्यात्मिक व्याख्याता जया किशोरी यांनी मुलींना आणि पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवा असे सांगितले आहे. ती पुढीलप्रमाणे-
मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना तो अनुरूप आहे की नाही हे लक्षात घ्या. त्याचे रूप, गुण, मिळकत, स्वभाव आपल्या मुलिशी ताडून बघा. त्यात फारकत असेल तर वेळेत नकार कळवण्याचे सौजन्य दाखवा. हीच बाब मुलाकडच्यांनाही लागू होते.
मात्र जया किशोरी विशेषतः मुलीच्या पालकांना विशेष सल्ला देतात. तो म्हणजे, 'मुलीच्या अपेक्षेप्रमाणे उच्च घरातला मुलगा शोधताना स्वप्नरंजन करू नका! सुखवस्तू कुटुंबात दिलेली मुलगी सुखीच होते असे नाही आणि मध्यमवर्गीय तसेच गरीब घरात दिलेली मुलगी दुःखी असते असेही नाही. दिवस सगळ्यांचेच बदलतात. सीतामाईसाठीदेखील जनक राजाने स्वयंवर ठेवले. शूर, वीर राजे बोलावले. रामाने पण जिंकला. सीतेशी विवाह झाला. आपली जानकी रघुवंशाची महाराणी होणार या विचाराने जनक राजा सुखावला. मात्र सीतेच्या नशिबात कालांतराने वनवास आला. तिने राजसुखाचा त्याग केला आणि वनवासात राहूनही आनंदाने स्वर्ग फुलवला. याचाच अर्थ, सुख निर्माण करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करा. त्यांना खंबीर बनवा. आहे त्या परिस्थितीशी लढा द्यायला शिकवा. तरच त्या सुखाने संसार करू शकतील.
त्यापेक्षा मुलाचे, घरच्यांचे स्वभाव बघा, आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि जोडी अनुरूप दिसत असल्यास होकार देऊन मोकळे व्हा. अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईलच शिवाय लग्नाचे वय वाढून लग्न करणारच नाही निर्णयापर्यंत मजल जाऊ शकेल हे नक्की! त्यापेक्षा वधू आणि वर मंडळींनी वेळीच सावध व्हा आणि लग्न हा व्यवहार न ठरवता आपुलकीचे नाते जोडा.'