देवी देवतांच्या मंदिराबद्दल आपण ऐकले आहे, पण मृत्यूची देवता असणाऱ्या यमराजाचेही मंदिर आहे, ही संकल्पना ऐकायलाही अवघड वाटते ना? स्वाभाविक आहे, मृत्यूची भीती प्रत्येकाला वाटते. अडीअडचणीच्या काळात आपण कितीही म्हटले, आता जगणं नको, मृत्यू हवा, तरी प्रत्यक्षात यमराज न्यायला येतात तेव्हा यमलोकी जाण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे यमराजाबद्दल प्रत्येकाच्या मनात भीती असते.
मृत्यू ही कोणालाही टाळता येणार नाही अशी बाब आहे. मग तो स्वीकारायचाच आहे तर घाबरून न स्वीकारता येईल तसा स्वीकारावा असे आपले जुने जाणकार सांगतात. एवढेच नाही तर मृत्यू चांगला यावा यासाठी प्रार्थनाही करतात.
अनायासेन मरणम्, बिना दैन्ये जीवनम्।देहान्त तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम्।।
अर्थ : अनपेक्षित मृत्यू, दारिद्रय, गरिबी, परावलंबी नसलेले जीवन मिळावे आणि जेव्हा जेव्हा मृत्यू यावा तोही परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.
ही प्रार्थना रोज रात्री झोपताना करायची. त्याबरोबरच यमराजाशी संबंधितही उपासना करायची. जसे की आपण धनत्रयोदशीला यमदीपदान करतो. त्याच्याप्रमाणे आणखी उपासना घडावी म्हणून यमराजाचे हे मंदिर बांधले असावे. त्याबद्दल जाणून घेऊ. हिमाचल प्रदेशात वसलेले यमदेवाचे हे एकमेव मंदिर आहे, पण तिथे जाण्यास भाविक घाबरतात.
मंदिराची भीती वाटण्याचे कारण :
लोक यमराजाच्या नावाने घाबरतात, कारण त्याला मृत्यूचा देव मानला जातो. यामुळेच लोक या मंदिरात जायलाही कचरतात. खरे तर हे अनोखे मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. असे म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा प्रथम या मंदिरात येतो. इथून त्यांना स्वर्ग मिळेल की नरक हे ठरवले जाते.
मंदिराविषयी :
यमराजाचे हे अनोखे मंदिर हिमाचलमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे आहे. हे मंदिर अगदी लहान आणि अगदी घरासारखे आहे पण त्याचा महिमा जगभर पसरलेला आहे. कारण, हे जगातील एकमेव मंदिर आहे. उंच पर्वतांच्या मधोमध वसलेले हे यमराजाचे खास मंदिर कधी आणि कोणी बांधले याची स्पष्ट माहिती कोणालाच नाही. पण, सहाव्या शतकात चंबाच्या राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात.
यमराज मंदिराशी संबंधित श्रद्धा
असे म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा प्रथम या मंदिरात येतो. येथे भगवान चित्रगुप्त एखाद्या व्यक्तीच्या पापांचे आणि पुण्यांचे तपशील पाहतात आणि तो स्वर्गात किंवा नरकात जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर यमराज त्या आत्म्याला सोबत घेऊन जातात असे म्हटले जाते. मृत्यूच्या भीतीने लोक या मंदिरापासून दूर पळतात. एवढेच नाही तर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर लोक बाहेरून यमाला हात जोडतात.
चित्रगुप्ताची खोली मंदिराच्या आवारात आहे :
या मंदिराच्या आत तुम्हाला एक रिकामी खोली दिसेल, जी चित्रगुप्ताची खोली असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा यमाचे दूत त्याचा आत्मा चित्रगुप्ताकडे आणतात. चित्रगुप्त देव येथे आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा लिहितात. यानंतर, त्याला चित्रगुप्ताच्या समोरच्या खोलीत म्हणजेच यमराजाच्या दरबारात नेले जाते. येथे काही क्रिया घडतात. मग त्या व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात हे ठरवले जाते. आता तुम्हीच ठरवा या मंदिरात जायचे की बाहेरूनच दर्शन घ्यायचे.