पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो. या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे. त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात. अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्दशर्करा योगच म्हटले पाहिजे.
इंदिरा एकादशीच्या दिवशी, पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही. या दिवशी आपला उपास असला, परंतु पितरांची तिथ असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गायीला, कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा.
इंदिरा एकादशीची पौराणिक कथा :
इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती. यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले. तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपास आणि पूजा करण्याचा नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे.
उपवास पद्धत :
इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या, पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा. ज्यांनी उपास केला नाही त्यांनी निदान वर म्हटल्याप्रमाणे पितरांना नैवेद्य अवश्य दाखवावा!