>> ज्योत्स्ना गाडगीळ
'बारा तासांच्या वर उपास घडला तर शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात असे संशोधन परदेशात आता सिद्ध होत आहे. परंतु हा शास्त्राभ्यास आपल्या पूर्वजांनी आधीच करून ठेवला आहे आणि त्याच आधारावर उपास, उपासना, परंपरा यांची आखणी केली आहे. गरज आहे, ती आपण समजून घेण्याची! त्यामुळे केवळ उपास करता आला नाही म्हणून वाईट वाटून न घेता त्यामागील शास्त्र समजून घ्या', असे सांगताहेत वारकरी कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील.
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील, कल्याण भिवंडी परिसरातील खांडवळ हे त्यांचे मूळ गाव. पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात भजनाची परंपरा आहे. पु, मारुतीमामा देहरेकर यांच्या आशीर्वादाने जगन्नाथ महाराजदेखील वयाच्या १४ व्या वर्षांपासून कीर्तन करत गेली २६ वर्षे हरिदासी परंपरेत आहेत. त्यांची दोन छोटी मुलेसुद्धा वारकरी, नारदीय कीर्तन शिकत आहेत. जगन्नाथ महाराज कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, कथा, ध्यानशिबीरे, अनेक उपक्रमांचे आयोजन करतात. शहापूर येथील सरळंबे या गावी ते वानप्रस्थ उपासना केंद्र चालवतात. तिथे ध्यानधारणा, कीर्तन प्रशिक्षण, कथा, प्रवचन इ. उपक्रम सुरू असतात.
महाराज सांगतात, 'नवीन पिढी जर आपल्या संस्कृतीचा उपहास करत असेल, तर त्याला कारणीभूत आपण आहोत. कारण आपण शास्त्रार्थ समजून घेतला नाही तर त्यांना समजवून कोण सांगणार? त्यामुळे त्यांना दोष देऊन चालणार नाही! याच हेतूने आम्ही मागील आठ वर्षांपासून दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री शहापूर येथे 'वर्षांत भजनोत्सव' हा उपक्रम राबवतो. जवळपास दीड हजार तरुण टाळ, पखवाज घेऊन रात्रभर भजन, कीर्तन करतात. याचाच अर्थ तरुणांना योग्य रीतीने गोडी लावण्याची गरज आहे. एवढेच काय, तर कल्याण येथे अचिव्हर्स नावाच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी दरवर्षी स्नेहसंमेलन कीर्तन कथेनेच पार पाडायचे असा आग्रह धरला.'
ते पुढे म्हणतात, 'अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा असतील तर देव, देश, धर्माची सेवा ही आपली मूलभूत कर्तव्य असली पाहिजेत. अध्यात्म समजावून सांगताना ते स-तर्क असावे अर्थात तर्कांवर आधारित असावे. शुद्ध अध्यात्म वैज्ञानिक असते. ते समजावून सांगताना आपण कमी पडतो आणि समोरचा ऐकत नाही म्हणून त्रागा करतो. विज्ञान जसे शोधाच्या मागे आहे तसे बोधाच्याही मागे असायला हवे. तरच आपला धर्म, परंपरा यांच्या संकल्पना सुस्पष्ट होतील.'
अनेक लोक एकादशीचा उपास करता येत नाही म्हणून खेद करतात. याबद्दल विचारले असता महाराज माउलींच्या ओवीचा संदर्भ देतात-
तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरापूजा केली होय अपारा, तोषालागी॥
अर्थात, चराचरात सामावलेल्या ईश्वराला स्वकर्माची माळा अर्पण करा, त्यामुळे तो संतुष्ट होतो! राहिला प्रश्न उपासाचा, तर उपास हा शब्द केवळ खाण्याशी संबंधित नाही, तर ईश्वराच्या सन्निध राहण्याचा तो काळ आहे. यादृष्टीने खाल्ल्यावर आळस येईल अशा पदार्थांचा त्याग करून केवळ फलाहार आणि नित्यकर्म, उपासना या गोष्टी उपासाला करणे जास्त महत्त्वाचे आहे.
उपास आणि उपासना मनुष्याला ऐहिक सुखापासून अलिप्त राहायला शिकवते. हीच शिकवण वारीतही मिळते. तिथे समतेचा बोध मिळतो. समाजातील सगळ्या स्तरातील लोक एकाच पातळीवर येऊन देवदर्शनाच्या ओढीने चालत असतात. म्हणून वारीचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असे म्हटले जाते. अलीकडे आपण मोबाईल शिवाय अर्धा तासदेखील बसू शकत नाही, अस्वस्थ होतो. हाच मोबाईल आपली मनःशांती बिघडवतो. नियमित वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत अशी अस्वस्थता कुठल्याच बाबतीत दिसत नाही. सामान्य मनुष्याच्या तुलनेत ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जास्त सुदृढ असतात. त्यांच्या ठायी प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला आणि सकारात्मक दृष्टी असते. हे शिक्षण वारीत मिळते. यावरून पुन्हा लक्षात येईल,की वारीदेखील मानस 'शास्त्राचा' अभ्यास घडवते.
थोडक्यात आपली संस्कृती शास्त्राधार घेऊनच मांडली आहे. तिला नावं ठेवण्यापेक्षा किंवा दुर्लक्ष करण्यापेक्षा ती समजून घेतली तर आनंद द्विगुणित होईल आणि मग उपास असो वा उपासना सहज शक्य होईल!'