>> ज्योत्स्ना गाडगीळ
आषाढी एकादशीचे वेध लागले. ठिकठिकाणची दिंडी सज्ज झाली आणि अशातच वारी नेमकी कोणत्या विठोबाकडे न्यायची असा संभ्रम उत्पन्न झाला तर? असेच काहीसे घडले १९७८ मध्ये!
पुण्यातील इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांनी 'केसरी'त एक लेख लिहीला, माढ्याचा विठोबाच खरा विठोबा! तो लेख खूप गाजला. परंतु त्या लेखामुळे पंढरपुरचा विठोबा खोटा का? हा प्रश्न अकारण उपस्थित झाला. या विषयाचा धांडोळा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी माढा आणि पंढरपुर परिसरात तज्ज्ञ मंडळींच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून काय निष्कर्ष निघाला, हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत जरूर वाचा!
रा. चिं. ढेरे यांनी आपल्या लेखात म्हटले होते, की 'रुपाचे अभंग' म्हणतात, त्यातील एका अभंगात विठ्ठलाच्या अंगावरची जी चिन्हे सांगितली आहेत, ती पंढरपुरच्या विठोबाच्या अंगी नाहीत, त्याअर्थी माढ्याचा विठोबाच खरा विठोबा आहे.
त्यावेळेस सावंत यांना प्रश्न पडला, की 'हजार वर्ष भक्तांच्या डोळ्यासमोर असलेला विठोबा खरा की खोटा हा विचार कोणाच्याच मनात आधी का आला नाही? ते खरे असेल तर देवाने आपला तोतया पंढरपुरात उभा का केला असा सवाल कोणत्याच संतांनी का केला नाही? केवळ एका अभंगावरून पंढरपुरच्या विठोबाचे अस्तित्त्व खोटे कसे ठरवता येईल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी माढा गाठायचे ठरवले.
माढा हे तालुक्याचे गाव. फलटणच्या निंबाळकरांच्या जहागीरदारीतले. त्यांच्याच वंशजांपैकी कोणा एकाने विठोबाचे मंदिर बांधले होते. माढा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. तिथे पोहोचल्यावर पत्रकार वसंत कानडे यांच्या मदतीने सावंत यांनी माढ्याच्या विठोबा मंदिराला भेट दिली.
ते देऊळ म्हणजे मोठे दगडी मंदीर नव्हते. विटांच्या चार भिंती व कौलारू छप्पर! कौलावर उगवलेले गवत वाळून पांढरे पडलेले. भिंतीच्या वरच्या बाजूच्या वीटा निखळून पडलेल्या. मध्यभागी एका चौकोनी दगडावर काळ्या कुळकुळीत, तुळतुळीत दगडाची विठोबाची मुर्ती उभी होती. मुर्ती छान होती, पण तिच्यावर धुळ बसली होती. पूजा-अर्चा काही होत असल्याची चिन्हे नव्हती. रा.चिं.ढेरे यांनी लिहिल्याप्रमाणे अभंगात वर्णन केलेली चिन्हे विठोबाच्या मुर्तीवर दिसत होती. माथ्यावर म्हणजे मुगुटावर शिवलिंग, छातीवर श्रीवत्सलांछन, गळ्यात वैजयंती माळ, पायात तोडे वगैरे होते. त्यामुळे ढेरे सरांचा सिद्धांत बरोबर ठरत होता.
परंतु, पंढरपुर जवळच असल्याने भक्तांचा ओढा त्या विठोबाकडे होता आणि माढ्याचा विठोबा दुर्लक्षित होता. तिथे आषाढी कार्तिकीचा उत्सवही होत नसल्याचे गावकऱ्यांकडून कळले. हा विठोबा खरा मानावा तर त्या मुर्तीची जराही झीज झाली नव्हती. याउलट परिस्थिती पंढरपुरात होती. तिथल्या विठोबाच्या पायावर दह्या, दुधाचे अभिषेक होऊन हजार वर्ष पाणी वाहिले गेले. त्याच्या पायावर डोकी घासली गेली, नारळ ठेवले गेले, त्यामुळे ते पाय पूर्णत: झिजले होते. त्या पावलांचे दर्शन आणि संबंधित माहिती घेण्यासाठी सावंत माढ्याहून पंढरपुरला गेले.
तिथे ह.भ.प.रामदासबुवा मनसुख भेटले. तेही म्हणाले, पंढरपुरच्या विठोबाला पाय राहिलेच नाहीत, उरलीत ती केवळ खुटं! पंढरपुरचे स्थानिक पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्याबरोबर सावंत यांनी पंढरपुरच्या विठोबाचे मनसोक्त दर्शन घेतले.
पंढरपुर येथील मुर्ती साध्या पाषाणाची आहे. माढ्यासारखी तुळतुळीत काळ्या रंगाची नाही. आम्लधर्म अभिषेकामुळे ती खूप खरबरीत झाली आहे. पायाची स्थिती तर मनसुख बुवांनी सांगितल्याप्रमाणे नुसती खुटं राहिली आहेत. त्या पावलांचे दर्शन घेऊन सावंतांनी ह.भ.प डिंगरे यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, 'आमच्या वारकरी पंथात विठ्ठलपर अभंग, पंढरीपर अभंग, नामश्रेष्ठत्त्वाचे अभंग अशी वर्गवारी आहे. रुपाचे अभंग वेगळे आहे. रुपाचे म्हणजे संतांना त्यांच्या तल्लीन ध्यानवस्थेत वेळोवेळी विठ्ठल जसे दिसले त्यारुपाचे वर्णन करणारे अभंग आहेत. एकाच संताला पन्नास शंभर रुपात दर्शन दिसले. अशा प्रत्येक अभंगावरून देवांची तुलना करत त्याला खरा खोटा कसा ठरवायचा? पंढरपुरचा देव झिजला. माढ्याचा विठोबा आहे तसा आहे.
पुष्कळ ठिकाणी भक्तांनी, संतांनी विठ्ठल मंदिरे स्थापन केली. माढा फलटणच्या निंबाळकरांच्या जहांगीरीत होते. वैभवाच्या काळात एखाद्या निंबाळकराने त्याला हवी तशी मुर्ती करून ती स्थापन केली असेल. विठ्ठल हा श्रीविष्णूंचा अवतार. मुर्तीकाराने विष्णूंची लक्षणे मुर्तीत आणली असतील. पण त्यामुळे पंढरपुरचा विठोबा खोटा ठरत नाही.' डिंगरे यांच्या विधानाला ह.भ.प लक्ष्मणराव ढोंबळे यांनीही दुजोरा दिला. सावंत यांच्या शोधपत्रकारितेला ग.ह.खरे यांनीदेखील मान्यता दिली. शेवटी युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला पंढरपुरचा विठोबा खरा ठरला आणि विषय मिटला.
अशा रितीने एका 'पंढरीनाथा' ने दुसऱ्या 'पंढरीनाथाचा' शोध घेतला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.