आपण पाहतो ती स्वप्नं कधी कधी शॉर्ट फिल्म सारखी असतात नाहीतर कधी वेब सिरीजसारखी! स्वप्नांची मालिका पाहताना आपण इतके आत आत गुंतत जातो की अलार्म वाजला, घरच्यांनी हाका मारल्या तरी ते स्वप्नं मोडून उठायची इच्छा होत नाही. काही जणांना झोपून उठल्यावर आणि उठून परत झोपल्यावर जाहिरातीचा ब्रेक घेतल्यासारखी स्वप्नं पुढे दिसत राहतात, तर काही जण नक्की काय स्वप्नं पडलं, या विचारात उठल्यानंतर तासभर स्वप्नच आठवत बसतात.
अशा या स्वप्नांच्या अनोख्या जगात आपण स्वतःला अनेक वेळा पाठमोरे पाहतो. म्हणजे प्रसंग घडत असतो, आपण उपस्थित असतो पण आपण स्वतःला दिसत नाही. तर कधी कधी असेही घडते, की स्वप्नं पडतात, प्रसंग एखाद्या चित्रपटातल्या सिन सारखा पुढे सरकत असतो आणि अचानक आपण त्या प्रसंगात विचित्र पेहराव, विचित्र अवस्था किंवा अनपेक्षित ठिकाणी दिसतो. ते पाहून आपल्याला घाम फुटून स्वप्नातून जाग येते आणि नेमकी अशी वाईट स्वप्नं दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात. मात्र एकसारखी भयावह स्वप्नं वारंवार दिसण्याने मानसिक आजार ओढवतात. याबाबत स्वप्नं ज्योतिष काय सांगते ते पाहू.
स्वतःला गाढवावर बसलेले पाहणे, नग्न स्थितीत पाहणे, पायरीवरून गडगडत खाली घसरताना पाहणे, हरवणे, परीक्षेच्या भीतीने घाम फुटणे अशी स्वप्नं अस्वस्थ मनस्थितीचे दर्शन घडवतात. मनावरील दडपण, अनामिक भीती यांचा दिवसरात्र विचार केल्यामुळे स्वप्नातही त्याच गोष्टी भयावह स्वरूपात दिसतात. त्यामुळे मनःस्थिती आणखी बिघडते. हे मानसिक आजाराचे लक्षण मानले जाते. मानस शास्त्राच्या दृष्टीने हा आजार आहे तर स्वप्न ज्योतिषाच्या दृष्टीने ते अशुभ आहे.
यावर उपाय हाच, की मनःस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. त्यावर खात्रीशीर उपाय म्हणजे ध्यानधारणा. यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दिवसभरातुन किमान २० मिनिटे तरी ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावरील दडपण कमी होईल व शांत झोप लागेल. तसेच झोपण्यापूर्वी अर्धा तास टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, गेम अशा मनाला अस्थिर करणाऱ्या कोणत्याही गोष्टी पाहू नये अन्यथा तेच विचार डोक्यात घोळत राहतात. झोपण्यापूर्वी देवाचे नाम घ्यावे, एखादे स्तोत्र म्हणावे, एक कपभर गरम दूध प्यावे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे अशी मनाला खात्री देऊन मगच झोपावे. या स्वयंप्रेरणेने विचारांची दिशा बदलते. मन सकारात्मक होते आणि वाईट स्वप्नं न पाहता शांत झोप लागते.